गाजावाजा झालेल्या राफेल विमानाची पहिली भरारी, राफेल गेमचेंजर ठरले, वायूसेनेची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 12, 2019 | 9:43 AM

देशभरात गाजलेलं राफेल (Rafale) लढाऊ विमानाने अखेर आकाशात भरारी घेतली. भारतीय हवाई दलाचे (IAF) उपप्रमुख अर्थात वाईस चीफ एयर मार्शल आर के एस भदौरिया यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची चाचणी घेतली.

गाजावाजा झालेल्या राफेल विमानाची पहिली भरारी, राफेल गेमचेंजर ठरले, वायूसेनेची प्रतिक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात गाजलेलं राफेल (Rafale) लढाऊ विमानाने अखेर आकाशात भरारी घेतली. भारतीय हवाई दलाचे (IAF) उपप्रमुख अर्थात वाईस चीफ एयर मार्शल आर के एस भदौरिया यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची चाचणी घेतली. राफेल विमान भारतासाठी गेम चेंजर ठरेल, अशी प्रतिक्रिया भदौरिया यांनी दिली.

राफेलची चाचणी घेतल्यानंतर भदौरिया म्हणाले, “खूपच जबरदस्त अनुभव होता. राफेल विमानाचा भारतीय वायूसेना कशापद्धतीने उपयोग करु शकेल, याबाबतचे अनेक बारकावे इथे शिकून घेतले. शिवाय एसयू -30 सोबत त्याचं संलग्नीकरण कसं करता येईल हे सुद्धा जाणून घेतलं जाईल”

राफेल लढाऊ विमानातील टेक्नॉलॉजी आणि हत्यांरांमुळे भारतीय वायूसेनेसाठी राफेल विमान गेम चेंजर ठरेल. युद्धजन्य परिस्थितींमध्ये राफेलची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास भदौरिया यांनी व्यक्त केला.

येत्या दोन महिन्यात राफेल विमान भारताला सोपवू असं फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जीगलर यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. शिवाय भारताला सर्व 36 राफेल लढाऊ विमाने येत्या दोन वर्षात सोपवण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं होतं.

राफेल खरेदी व्यवहार

भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल विमान खरेदीचा व्यवहार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर देशभरात राफेल खरेदी व्यवहारावरुन मोठा राडा पाहायला मिळाला. तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. यूपीए सरकारने केलेल्या व्यवहाराच्या दुप्पट किमतीत हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. शिवाय मोदींनी अनिल अंबानींना थेट फायदा पोहोचवल्याचा आरोप आहे. लोकसभा निवडणुकांमध्येही राफेल डीलचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

राफेलचं वैशिष्ट्य काय?

राफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो.

राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.

हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.

यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

राफेल विमान करार

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता.


संबंधित बातम्या :

18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट

राफेल करार कसा झाला? सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं!

‘राफेल’ असते, तर परिणाम वेगळे असते : एअरफोर्स चीफ मार्शल