महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ 1 नोव्हेंबरला काळ्या फिती बांधून कामकाज पाहणार : जयंत पाटील

| Updated on: Oct 30, 2020 | 6:49 PM

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी काळ्या फिती बांधाव्यात, असं आवाहन केलं आहे (Jayant Patil on Belgaum and Maharashtra border peoples).

महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ 1 नोव्हेंबरला काळ्या फिती बांधून कामकाज पाहणार : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे (Jayant Patil on Belgaum and Maharashtra border peoples).

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना सीमा भागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी काळ्या फिती बांधाव्यात, असं आवाहन केलं आहे (Jayant Patil on Belgaum and Maharashtra border peoples).

“माझ्या सहकाऱ्यांनो, सीमा भागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करु, दडपशाहीचा धिक्कार करु”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

याआधी महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात -बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेने महाराष्ट्र दणाणून सोडला. दुर्दैवाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवताना सीमाभाग मात्र आपण मिळवू शकलो नाही. भाई दाजीबा देसाईंच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीपासून ते आताच्या काळा दिन आणि हुतात्मा दिनाला आंदोलन करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सहा दशकांहून अधिक काळ सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठीचा लढा चालू आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

सीमाभागातील लोकांचे बलिदान, त्याग आणि धाडस याचं खूप मोठं उपकारांचं ओझं महाराष्ट्राच्या मनावर आहे. शक्य त्या पद्धतीने त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत, असंही पत्रात नमूद केलं गेलं आहे.

महाराष्ट्र शासनाने हा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा यशस्वी व्हावा यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता युद्ध पातळीवर करत आहोत. पण फक्त तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. सीमाप्रश्न आणि सीमाभागातील लोकांच्या इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणारा सीमाकक्ष नव्या जोमाने प्रयत्न करत आहे, अशी ग्वाहीही शासनाच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा :

तो ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही तुमच्यासोबतच, ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांचं सीमाभागातील बांधवांना पत्र