दुष्काळात ट्रेनने तहान भागवली, पण रेल्वेच्या बिलाने लातूर महापालिकेचं ‘पाणी’ काढलं

| Updated on: Sep 05, 2019 | 8:21 PM

रेल्वे मंत्रालयाने (water supply railway) लातूर महापालिकेला पत्र पाठवून नऊ कोटी रुपये बिल थकीत असल्याचं सांगितलंय. हे थकीत बिल भरण्याची मागणी करण्यात आल्यामुळे लातूर महापालिकेसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

दुष्काळात ट्रेनने तहान भागवली, पण रेल्वेच्या बिलाने लातूर महापालिकेचं पाणी काढलं
Follow us on

लातूर : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या लातूरला पिण्यासाठीही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या काळात मिरजहून रेल्वेने पाणी (water supply railway) पुरवण्यात आलं. सध्याही लातूरमध्ये अशीच परिस्थिती आहे. त्यातच रेल्वे मंत्रालयाने (water supply railway) लातूर महापालिकेला पत्र पाठवून नऊ कोटी रुपये बिल थकीत असल्याचं सांगितलंय. हे थकीत बिल भरण्याची मागणी करण्यात आल्यामुळे लातूर महापालिकेसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

लातूरला 2016 मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. मिरज येथून दररोज 25 लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी पाठवण्यात आलं. रेल्वेच्या टँकरने तब्ब्ल 111 फेऱ्यांमधून 25 कोटी 95 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला. लातूरकरांना आपण सामाजिक भावनेने पाणी देत आहोत, त्याचा कसलाही मोबदला आम्ही मागणार नाही, असं रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं. नंतर मात्र रेल्वेने लातूर महापालिकेला नऊ कोटींच्या थकीत बिलाची मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यावर राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तोडगा काढत हे बिल महापालिकेकडून घेऊ नये असं कळवण्यात आल. पण आता बिल भरण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे.

आर्थिक अडचणीत असलेली लातूर महापालिका रेल्वेच्या या बिलाचा भरणा करण्यास असमर्थ असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे लातूरकरांच्या संभाव्य पाणी टंचाईवर रेल्वे हा पर्याय ठरेल का? हा प्रश्न निर्माण झालाय.

लातूरला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण कोरडंठाक पडलं आहे. याशिवाय जिल्ह्यातही कुठे लातूर शहराला पुरवठा करता येईल असा जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे टंचाईच्या काळात रेल्वे हा एक पर्याय ठरू शकतो. मात्र त्या अगोदरच रेल्वेने थकीत बिलाच्या वसुलीचा विषय ऐरणीवर आणून नवीन वादाला तोंड फोडलं आहे.