‘आणीबाणी’तील बंदीजनांना पेन्शननंतर आता सन्मानपत्र देणार : मुख्यमंत्री

| Updated on: Jun 25, 2019 | 4:46 PM

एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत बंदीजन असलेल्यांना पाच हजार तर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येते.

आणीबाणीतील बंदीजनांना पेन्शननंतर आता सन्मानपत्र देणार : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना राज्य सरकारतर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत बंदीजन असलेल्यांना पाच हजार तर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येते. आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत 3267 जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगावा लागला होता. ते आज विविध ठिकाणी आहेत त्यांची शपथपत्रे घेण्यात येतात. मात्र, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय ते मंजूर करण्यात येत नाही.

तसेच संबंधित कामकाज कालमर्यादेत पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील. भविष्यात हा निधी वाढविण्यासाठी विचार करण्यात येईल. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम संबंधित सर्व सैनिकांना मानधन प्रदान करण्यात येते. या सैनिकांना आणि आणीबाणीत बंदीवास भोगलेल्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.