अभिजित पोते, पुणेः विधान परिषद निवडणुकांनंतर (MLC Election) आता पुण्यातील पोट निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलंय. पुण्यातील घडामोडींना प्रचंड वेग आलाय. कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीत (By Election) भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तर याच निवडणुकीत मनसेदेखील मैदानात उतरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. कसबा पेठ निवडणुकीत मनसेचा उमेदवार कोण असेल, यावर या दौऱ्यात चर्चा होईल. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.
सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच शहर कार्यकारणी यांनी तयार केलेली इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासतील. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकता, असा विश्वास राज ठाकरे यांनी दर्शवला आहे.
पुण्यातील शहर कार्यकारिणीकडून राज ठाकरे यांच्याकडे काही नावं गेली आहेत. मनसे कार्यकर्त्यांपैकी गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे अशी कसबा पोटनिवडणुकीसाठी पुढे आली आहेत. यापैकीच एकाच्या नावावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पुण्यात कसबा पेठ येथील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या ठिकाणी हेमंत रासणे यांना तिकिट देण्याची तयारी भाजपने केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज तशी घोषणा केली.
महाविकास आघाडीनेही कसब्यातील उमेदवार निश्चित केला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालाय.
तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुव कलाटे यांना मविआने उमेदवारी दिली आहे.