बीडमध्ये गावकऱ्यांच्या खात्यावर अचानक पैसे जमा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

बीड : खात्यावर 15 लाख कधी जमा होणार असं म्हणून मोदी सरकारला टोमणा मारला जातो. पण खरंच हे पैसे यायला सुरुवात झाली की काय असा प्रश्न बीड जिल्ह्यात निर्माण झालाय. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील तब्बल 150 नागरिकांच्या खात्यावर अचानक पैसे जमा झाल्याने एकच चर्चेचा विषय बनला आहे. 500 रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यंत पैसे खात्यावर […]

बीडमध्ये गावकऱ्यांच्या खात्यावर अचानक पैसे जमा
Follow us on

बीड : खात्यावर 15 लाख कधी जमा होणार असं म्हणून मोदी सरकारला टोमणा मारला जातो. पण खरंच हे पैसे यायला सुरुवात झाली की काय असा प्रश्न बीड जिल्ह्यात निर्माण झालाय. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील तब्बल 150 नागरिकांच्या खात्यावर अचानक पैसे जमा झाल्याने एकच चर्चेचा विषय बनला आहे. 500 रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यंत पैसे खात्यावर जमा झाले आहेत.

ग्राहकांच्या खात्यावर हे पैसे कोणी पाठवले, कुठून आले याची माहिती कुणालाही नसल्याने एकच चर्चा रंगली आहे. अचानक खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी मात्र एकच गर्दी केली.

देशातील नागरिकांच्या खात्यावर प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करणार असल्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. याच आश्वासनावरुन सरकारची खिल्ली उडवली जाते. त्यातच हा धनलाभ झाल्याने अनेकांनी तर्क-वितर्कही लावले.

29 तारखेला नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अचानक पैसे जमा झाल्यामुळे नागरिक मोठ्या आनंदात होते. नागरिकांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेजमध्ये beed nic असे नाव आहे. मात्र याची चौकशी केली असता याची माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही. अचानक पैसे आल्याने नागरिक मात्र खुश झाले असून पैसे काढण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रात मोठी झुंबड उडाली.

नागरिकांच्या बँक खात्यात beed nic नावाने पैसे जमा झाले आहेत. मात्र या पैशाचा आणि जिल्हा प्रशासनाचा कसलाच संबंध नाही. पैसे आमच्याकडून गेलेच नसल्याने चौकशी करण्याची काही गरज वाटली नसल्याचं बीडचे निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर नागरिकांनी स्थानिक कृषी सेवा केंद्रात मोठी गर्दी केली. आतापर्यंत 50 ते 55 लोकांना पैशाचं वाटप करण्यात आलं आहे. बँक खात्यावर पैसे आल्यानंतर ते पैसे वाटले आहेत असं ग्राहक सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.