विदर्भात आगमनासाठी मान्सून गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडणार?

| Updated on: Jun 21, 2019 | 6:49 PM

दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलंय खरं, पण उर्वरित महाराष्ट्र अजून कोरडाठाक असल्याने पावसाकडे डोळे लागले आहेत.

विदर्भात आगमनासाठी मान्सून गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडणार?
Follow us on

नागपूर : सर्वाधिक उष्णता सोसलेल्या विदर्भात मान्सून उशिरा येण्याचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये 26 जूनला मान्सूनचं आगमन झालं होतं. आता यावर्षी 21 जून होऊन सुद्धा विदर्भात मान्सूनचं आगमन झालं नसल्याने चिंता वाढली आहे. दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलंय खरं, पण उर्वरित महाराष्ट्र अजून कोरडाठाक असल्याने पावसाकडे डोळे लागले आहेत.

मृग नक्षत्र संपायला आलं तरी विदर्भात पावसाची प्रतीक्षा अद्यापही सुरूच आहे. गेल्या 10 वर्षात मान्सूनच्या आगमनाचा इतका उशीर कधीही झालेला नाही. मान्सूनला उशीर होत असल्याने पावसाळ्याचे दिवस देखील कमी होत आहेत. पहिल्या पावसाच्या सरी आज ना उद्या कोसळतील या अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्र एखाद्या चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. मात्र या वर्षीच्या पावसाचे आगमन प्रचंड लांबणीवर पडल्याने सामान्यांसोबत शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.

गेल्या 10 वर्षात पावसाच्या आगमनाला इतका उशीर कधीही झालेला नाही. 2009 मध्ये सर्वात उशिरा म्हणजेच 26 जूनला मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून मान्सून 19 जूनच्या दरम्यान नागपूर आणि विदर्भात बरसला. त्यामुळे या वर्षी 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडित निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यातही पावसाची प्रतीक्षा

आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता प्रचंड वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात पाऊस बरसत आहे. येत्या तीन दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे येत्या आठवडाभरात राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यातल्या त्यात दुष्काळी मराठवाड्यात 23 आणि 24 जून रोजी जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल.