धाकधूक संपली, येत्या 72 तासात मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार!

| Updated on: Jun 04, 2019 | 8:42 PM

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 72 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील उष्णता कमी होईल.

धाकधूक संपली, येत्या 72 तासात मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार!
Follow us on

पुणे : मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. येत्या 72 तासात मान्सूनचं केरळात आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. साधारण 6 ते 7 तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागलेत.

मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळे 12 तारखेला राज्यात मान्सून बरसेल. मात्र वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या 38 तासांत विदर्भातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

देशात यंदा 96 टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता होती. मात्र सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा 100 टक्के पाऊस बरसणार आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय.

पाणीटंचाईचं संकट

राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजूनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सरासरी केवळ  7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

विभागनिहाय धरणांच्या जलसाठ्यांचा विचार केला तर औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये अवघा 0.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्याच्या धरणांमध्ये 6 टक्के, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 7 टक्के, नाशिक विभागातील धरणांमध्ये 6 टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

विदर्भात उष्णतेची लाट

नागपुरात उष्माघातामुळे आतापर्यंत 10 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावलाय. नागपूरसह चंद्रपुरातही उन्हाने कहर माजवलाय. 48 डिग्रीपर्यंत तापमान नोंदवण्यात आलंय. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची उन्हामुळे लाहीलाही होत आहे.