हळदी समारंभात रक्ताचं थारोळं, भावकीच्या वादातून कुऱ्हाडीने वार

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ठाणे : लग्नातील हळदीचा समारंभ रक्ताने रंगल्याची थरारक घटना भिवंडीत घडली. जमिनीच्या वादातून दुसऱ्याच्या हळदीत भावकीचा वाद उफाळून आला. त्या वादातून चुलत भाऊ आणि पुतण्यांनी मिळून कुऱ्हाडीने वार केल्याने 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील दुधनी या गावात ही थरारक घटना घडली. चिंतामण जाधव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. काय आहे प्रकरण? भिवंडी तालुक्यातील पडघा […]

हळदी समारंभात रक्ताचं थारोळं, भावकीच्या वादातून कुऱ्हाडीने वार
Follow us on

ठाणे : लग्नातील हळदीचा समारंभ रक्ताने रंगल्याची थरारक घटना भिवंडीत घडली. जमिनीच्या वादातून दुसऱ्याच्या हळदीत भावकीचा वाद उफाळून आला. त्या वादातून चुलत भाऊ आणि पुतण्यांनी मिळून कुऱ्हाडीने वार केल्याने 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील दुधनी या गावात ही थरारक घटना घडली. चिंतामण जाधव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळच्या पाच्छापूर नजीकच्या दुधनी या गावात चिंतामण जाधव यांचे चुलतकाका अनंत लिंबा जाधव यांच्यासोबत कौटुंबीक जमिनीचा वाद होता. त्यावरुन मागील काही दिवस त्यांच्यात भांडणे सुरु होती. शुक्रवारी 10 मे रोजी दुधनी गावात एका घरी लग्नसमारंभानिमित्त हळदी समारंभ होता. रात्री हा कार्यक्रम रंगात आला होता. त्याठिकाणी चिंतामण जाधव गेले होते. मात्र त्यांच्या घराशेजारी राहणारे चुलतकाका अनंत लिंबा जाधव आणि त्यांची मुलं अरुण आणि प्रकाश यांच्यात वाद झाला.

त्यानंतर चिंतामण जाधव हे रात्री दीडच्या सुमारास आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी अनंत जाधव आणि त्यांच्या मुलांनी चिंतामण जाधवांना फरफटत आपल्या घराजवळ आणलं. तिथे त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने चिंतामण जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना त्याच अवस्थेत टाकून अनंत जाधव आणि मुलं घरात निघून गेले.

या गदारोळात चिंतामण जाधव यांचा मुलगा नितीन घटनास्थळी आला. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर त्याने तातडीने आपल्या कुटुंबीयांना बोलावून घेतलं. मग कुटुंबीयांनी जखमी चिंतामण जाधवांना अंबाडी इथं उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती पडघा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन हत्येचा गुन्हा दाखल केला.