Lockdown : ना लॉकडाऊनचा अडथळा, ना संचारबंदीचं उल्लंघन, औरंगाबादमध्ये व्हिडीओ कॉलवरच लगीनगाठ

| Updated on: Apr 04, 2020 | 10:15 AM

औरंगाबामधील काही लोकांनी लॉकडाऊनदरम्यान लग्न करण्याची एक अनोखी शक्कल लढवत व्हिडीओ कॉलद्वारे लग्न लावले आहे (Nikah of couple through video call).

Lockdown : ना लॉकडाऊनचा अडथळा, ना संचारबंदीचं उल्लंघन, औरंगाबादमध्ये व्हिडीओ कॉलवरच लगीनगाठ
Follow us on

औरंगाबाद : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी (Nikah of couple through video call) देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक नियोजित धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक लग्न समारंभही रद्द करण्यात आले आहेत. मात्र, औरंगाबादमधील काही लोकांनी लॉकडाऊनदरम्यान लग्न करण्याची एक अनोखी शक्कल लढवत व्हिडीओ कॉलद्वारे लग्न लावले आहे (Nikah of couple through video call).

औरंगाबादचा मोहम्मद मिन्हाजुद या तरुणाने काल (3 एप्रिल) बीडच्या तरुणीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे लग्न केलं. त्यांच्या व्हिडीओ कॉलवर लागलेल्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय हे लग्न देशभरात चर्चेत आलं आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“दोघांचं लग्न सहा महिन्यांअगोदर ठरलं होतं. लग्नाची सहा महिन्यांपासून तयारी सुरु होती. त्यावेळी कोरोनाचा धोका नव्हता. सर्व नातेवाईक आणि ज्येष्ठ मंडळी लग्नानिमित्ताने आमच्या घरी एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाचं संकंट आलं आणि लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. लग्न सहा महिन्यांअगोदरच ठरलेलं असल्यामुळे व्हिडीओ कॉलद्वारे लग्न करण्याचं ठरवलं”, असं नवरदेवचे वडील मोहम्मद गयाज यांनी सांगितलं.

या दाम्पत्याचा लग्न समारंभ काजी मुफ्ती अनीस उर रहमान यांच्या सूचनांनुसार पार पडला. नवरदेव औरंगाबादला होता तर नवरी बीडमध्ये होती. व्हिडीओ कॉलद्वारे त्यांचं लग्न करण्यात आलं. “नवरदेव आणि नवरी या दोघांचे कुटुंबिय खूप आनंदी आहेत. कारण लग्न फार कमी खर्चात झालं”, असं काजी मुफ्ती अनीस उर रहमान यांनी सांगितलं.

याअगोदरही अशाच प्रकारचं लग्न झारखंडमध्ये करण्यात आलं होतं. तालझारी तालुक्यातील लालमाटी गावाचे डॉक्टर पीर मोहम्मद यांनी आपली मुलगी साबिजा नाजचा विवाह व्हिडीओ कॉलद्वारे केला होता. त्यावेळी नवरी लालमाटी तर नवरदेव पाकुड जिल्ह्यातील मंझलाडीह गावात होता.