सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर जाण्यापूर्वी ही बातमी वाचा

| Updated on: Jul 16, 2019 | 4:18 PM

सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन तासनतास वाहनं अडकून पडल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर जाण्यापूर्वी ही बातमी वाचा
Follow us on

पुणे : सिंहगड हे सुट्टीसाठी पुणेकरांचं आवडीचं पर्यटनस्थळ आहे. त्यात पावसाळ्यात तर सिंहगडावर जाण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. पण सिंहगड किल्ल्यावर आता सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 वाजल्यानंतर जाता येणार नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन तासनतास वाहनं अडकून पडल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

या रविवारी 14 जुलैला सुद्धा सिंहगड रस्त्यावर ट्राफिक जाम होऊन तब्बल पाच तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गडावरही मोठी कोंडी झाली होती. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पातळीवरील विभागांची समन्वय बैठक घेऊन सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 नंतर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडकवासला चौपाटीवर पार्किंग करता येणार नाही अशी भूमिकाही घेण्यात आली आहे. या समन्वय बैठकीला पाठबंधारा विभागाचे अधिकारी, सिंहगडचे उपसरपंच, नांदोशीचे सरपंच तसेच पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

सुट्टी आणि गर्दीच्या दिवशी चौपाटी परिसरात हातगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. तेथे वाहने उभी करता येणार नाहीत. वाहने उभी करण्यासाठी स्थानिक जागा असलेल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे पाण्यात उतरण्यास सुद्धा बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात येऊन त्यांची माहिती देणारे फलकही लावण्यात येणार आहेत.