झाडे लावा आणि स्वर्गात जावा, सुधीर मुनगंटीवारांचा सल्ला

| Updated on: Jun 24, 2019 | 8:17 AM

आजच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रात पाण्याचे 6778 टँकर सुरु आहेत. मात्र ज्या ठिकाणी जंगल आहे तिथे टँकर लावण्याची गरज पडली नाही. जिथे जंगल आहे तिथे जल आहे आणि जल आहे तिथे भावी पिढीचं भविष्य आहे.

झाडे लावा आणि स्वर्गात जावा, सुधीर मुनगंटीवारांचा सल्ला
Follow us on

वर्धा : वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगताना, 33 कोटी देवाचे नाव जपले जाते. पण यंदा 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करा आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग सुकर करा, असा वेगळाच सल्ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिला आहे. ते वर्ध्यातील आंजी मोठी येथील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित वृक्ष दिंडीचा उद्घाटन समारंभात बोलत होते. झाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे. याचा उल्लेख पद्म पुराणात शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या खंड 58 मध्ये असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. गडकरींचे नॅशनल हायवे होत आहे, पण स्वर्गात जाण्यासाठी कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरची गरज नाही, त्यासाठी पिंपळाचे वडाचे औदुंबराच्या झाडे लावा आणि स्वर्गात जावा, असं मुनगंटीवार म्हणाले.

आजच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रात पाण्याचे 6778 टँकर सुरु आहेत. मात्र ज्या ठिकाणी जंगल आहे तिथे टँकर लावण्याची गरज पडली नाही. जिथे जंगल आहे तिथे जल आहे आणि जल आहे तिथे भावी पिढीचं भविष्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड हे ईश्वरीय काम आहे. आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती भयानक आहे. हे असेच सुरु राहीले तर 2040 मध्ये एक थेंब पाणी विकत घेण्याची वेळ येईल. हे टाळायचे असेल, तर वृक्ष लागवडीसारखा दुसरा पर्याय नाही कारण पाणी तयार केले जाऊ शकत नसल्याचे सांगत मुनगंटीवारांनी दुष्काळाची भीषणता जनतेसमोर मांडली.

राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. गुरांना चारा देण्यासाठीही पुरेसा चारा नसल्यामुळे सरकारने प्रत्येक गावात चारा छावण्या तयार केल्या आहेत. अशा भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत. यामुळे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्यावतीने वृक्ष लागवडीचा मोलाचा संदेश जनतेला देण्यात आला.