‘शीख धर्म स्वीकारु किंवा मरु, पण हेल्मेट घालणार नाही’, पुणेकरांचा हट्ट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे: ‘एक वेळ शीख धर्म स्वीकारु पण हेल्मेट घालणार नाही’, मरण जरी आलं तरीही हेल्मेट वापरणार नाही अशी हट्टी भूमिका पुणेकरांनी घेतली आहे. आज पुण्यात हेल्मेटविरोधी कृती समितीने वेगवेगळ्या टोप्या, पगड्या घालून अनोखं सविनय कायदेभंग चळवळ आंदोलन केले. त्याचबरोबर पुण्यात शिवसेनेच्यावतीने हडपसरमध्ये हेलमेटची अंत्ययात्रा काढली. हेल्मेटसक्तीचा विरोध करताना ‘पुणेकरांचे हाल, पोलीस मालामाल’, हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या […]

शीख धर्म स्वीकारु किंवा मरु, पण हेल्मेट घालणार नाही, पुणेकरांचा हट्ट
Follow us on

पुणे: ‘एक वेळ शीख धर्म स्वीकारु पण हेल्मेट घालणार नाही’, मरण जरी आलं तरीही हेल्मेट वापरणार नाही अशी हट्टी भूमिका पुणेकरांनी घेतली आहे. आज पुण्यात हेल्मेटविरोधी कृती समितीने वेगवेगळ्या टोप्या, पगड्या घालून अनोखं सविनय कायदेभंग चळवळ आंदोलन केले. त्याचबरोबर पुण्यात शिवसेनेच्यावतीने हडपसरमध्ये हेलमेटची अंत्ययात्रा काढली.

हेल्मेटसक्तीचा विरोध करताना ‘पुणेकरांचे हाल, पोलीस मालामाल’, हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. या निषेध मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

राज्यभरात न्यायालयाच्या निकालानुसार हेल्मेटसक्ती लागू आहेच. त्यामुळे पुण्यात ती ‘लागू’ झाली आहे, असे नव्हे, तर त्या सक्तीची काटेकोरअंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीबाबत ठाम असून, गेल्या आठवड्यापासूनच शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरील कारवाई तीव्र करण्यात येत आहे. तर, पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेत ‘हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती’नेही आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे शहरात हेल्मेट खरेदीही जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.

गेल्या तीन दिवसांत वाहतूक शाखेकडून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वीस हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कारवाईबरोबर हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांच्या शोधासाठी पोलिसांकडून शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येत आहे. हेल्मेटसक्तीच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला दिवसभरात हेल्मेट न वापरणाऱ्या पाच हजार, तर 1 जानेवारीला सात हजार 490 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विरोधी पक्षांची कृती समिती हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेच्या पुढाकाराने हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘ग्राहक पेठ’चे सूर्यकांत पाठक यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना हेल्मेट सक्तीच्याविरोधात आग्रही असणाऱ्या भाजपने आतापर्यंत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी हेल्मेट सक्ती हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यासाटी आज पत्रकार भवनवरून बाईक रॅली काढण्यात आली. बाईकवरुन येऊन पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं.

VIDEO: