मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..!, पतीच्या आत्महत्येनंतरही न डगमगणाऱ्या शिलाताईंची संघर्षकथा, शिलाई प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वावलंबनाचे धडे

| Updated on: Nov 08, 2020 | 7:41 PM

लातूर जिल्ह्यतील निलंगा येथील शिलाताई सूर्यवंशी यांनी पतीच्या निधना नंतर मोठ्या धाडसाने स्वतः स्वावलंबी होताना इतरही महिलांना स्वावलंबी करण्याचं धाडसी कार्य हाती घेतलं आहे. ( Shilatai Suryawanshi stands for women whose husband committed suicide)

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..!, पतीच्या आत्महत्येनंतरही न डगमगणाऱ्या शिलाताईंची संघर्षकथा, शिलाई प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वावलंबनाचे धडे
Follow us on

लातूर : गेल्या काही वर्षांमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या शेतकरी पतीने आत्महत्या केल्यानंतर शेकडो कुटुंब उध्वस्त झाली. मुलांच्या पालन पोषणाच्या चिंतेने अनेक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी अडचणीत आल्या. मात्र, लातूर जिल्ह्यतील निलंगा येथील शिलाताई सूर्यवंशी यांनी पतीच्या निधना नंतर मोठ्या धाडसाने स्वतः स्वावलंबी होताना इतरही महिलांना स्वावलंबी करण्याचं धाडसी कार्य हाती घेतलं आहे. आता पर्यंत त्यांनी ५०० महिलांना शिवणकला आणि शेती उपयोगी कामांमध्ये प्रशिक्षित करून त्यांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे. ( Shilatai Suryawanshi stands for women whose husband committed suicide)

लातूर जिल्ह्यातल्या कलमुगळी गावात शिलाताई सूर्यवंशी राहतात. शिलाताई यांचं घरच शिलाई प्रशिक्षणाचं वर्कशॉप आहे. शिलाताई यांच्या पतीने शेतात विहीर आणि बोअर घेतला होता, ज्याचं दोन लाख रुपयांचं कर्ज फेडण्याच्या तणावातून त्यांच्या पतीने २०१५ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्या नंतर शिलाताई यांच्यावर दोन मुली, एक मुलगा आणि सासूच्या पालन पोषणाची जवाबदारी येऊन पडली. त्यामुळं शिलाताईनी स्वतःला दुःखातून सावरत शिवणकाम शिकले.

पैशांच्या स्वरुपातील मदत नाकारली

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब म्हणून एका सामाजिक संस्थेने काही पैशांची मदत करण्याचं बोलून दाखवले. मात्र, शिलाताईंनी ही मदत न स्विकारता, शिलाई मशीन मदत म्हणून देण्याची विनंती केली. शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील महिलांना स्वावलंबी करण्याचं शिलाताई यांचं स्वप्न होतं, त्यांची जिद्द पाहून त्यांना एका सामाजिक संस्थेने दहा शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. या मदतीतून शिलाताईंनी स्वावलंबनाचा प्रयत्न सुरु झाला. त्यांनी निलंगा तालुक्यातल्या १७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांचा एक बचत गट तयार केला. यामधल्या १२ जणींना तीन महिन्यांचं प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वावलंबी केलं . तर पाच महिलांना शेती अवजारे उपलब्ध करून देऊन त्यांना आधार दिला.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, शिलाताईंचं आवाहन

कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, कुटुंबाचा विचार करुन आत्महत्येचा विचार करु नका,असं आवाहन शिलाताई सुर्यवंशी यांनी केली. निलंगा तालुक्यातील ज्या महिलांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली त्या12 महिलांची भेट घेतली, त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिलं. त्यांचे प्रश्न समजून घेतले. सामाजिक संस्थांना मदतीची आवाहन करत शिलाई मशीन द्यावी, अशी विनंती केली आणि हळूहळू व्यवसाय सुरु केला, असं शिलाताई सूर्यवंशी यांनी सांगितले.

500 महिलांना प्रशिक्षण

शिलाताईंच्या वर्कशॉप मध्ये विधवा ,परित्यक्ता आणि गरजू महिलाना विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. काहींनी गाई-म्हशी घेऊन दूध संकलनाचा व्यवसाय सुरु केलाय तर कोणी शेती आवाजरे घेऊन शेती पुन्हा उभी केलीय. काही महिलांनी कपडे शिलाईच्या माध्यमातून कुटुंबाला मदत करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे शिलाताईंच्या वर्कशॉपमध्ये प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या महिलांची संख्या आता पाचशेच्यावर गेलीय. त्यामुळे शेतकरी पतीच्या निधनानंतर हिम्मत न हारता स्वतः बरोबरच इतर महिलांनाही स्वावलंबी करण्याचं काम हाती घेतलेल्या शिलाताई यांचं काम परिस्थितीपुढे हात टेकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

संबंधित बातम्या : 

शिरुरमध्ये काश्मीर! ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड

Silk Farming | जय-विरुची जोडी, शेतात राबली, संकटकाळात रेशीम शेतीतून लाखो कमावले

( Shilatai Suryawanshi stands for women whose husband committed suicide)