VIDEO : ट्रेंट बोल्टच्या हेल्मेटमध्ये बॉल अडकला, कॅच घेण्यासाठी सगळेच धावले

| Updated on: Aug 17, 2019 | 2:03 PM

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत होता, त्यावेळी गमतीशीर घटना घडली.

VIDEO : ट्रेंट बोल्टच्या हेल्मेटमध्ये बॉल अडकला, कॅच घेण्यासाठी सगळेच धावले
Follow us on

नवी दिल्ली : श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एक मजेशीर घटना घडली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत होता, त्यावेळी गमतीशीर घटना घडली. श्रीलंकेचा फिरकीपटू लसिथ एमबुलदेनियाच्या गोलंदाजीवर बोल्टने फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू थेट हेल्मेटमध्ये जाऊन अडकला.

नेमका चेंडू कुठे गेलाय हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना काही वेळ समजलंच नाही. बोल्टच्या हेल्मेटमध्ये चेंडू अडकल्याचं पाहून फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारे सर्व खेळाडूंना हसू आवरणं कठीण झालं.

स्वीप करताना चेंडू हेल्मेटमध्ये डकला

न्यूझीलंडच्या डावातील 82 व्या षटकात हा किस्सा घडला. श्रीलंकेचा लसिथ एमबुलदेनिया गोलंदाजी करत होता. लसिथने टाकलेला चेंडू बोल्टने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू थेट हेल्मेटवर जाऊन आपटला आणि तो तिथेच अडकला. त्यावेळी लंकेच्या खेळाडूंनी कॅच पकडण्यासाठी बोल्टला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र बोल्टने तो पकडू नये याची काळजी घेत, तो श्रीलंकन खेळाडूंपासून दूर जात होता.

दरम्यान, या कसोटीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 267 धावा करत, 18 धावांची आघाडी घेतली. मग न्यूझीलंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 7 बाद 195 धावा केल्या होत्या.

आयसीसी टेस्ट विश्वकपमधील ही दुसरी कसोटी मालिका आहे. पहिली कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अशेस मालिका आहे. तर तिसरी मालिका भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.