बाईक येत नाही, पठ्ठ्याने दुचाकीवर ड्रायव्हर ठेवला!

| Updated on: Jun 14, 2019 | 5:49 PM

सोलापुरातील एका अवलियाने आपल्याला मोटारसायकल येत नाही म्हणून चक्क मजुरीवर चालकच ठेवला आहे.

बाईक येत नाही, पठ्ठ्याने दुचाकीवर ड्रायव्हर ठेवला!
Follow us on

सोलापूर : माणूस हौसेखातर कधी काय करेल याचा नेम नाही. चार चाकी वाहनासाठी चालक ठेवले जातात. मात्र कुणी दुचाकीसाठी चालक ठेवलेला आपण कधी ऐकलं नसेल. सोलापुरातील एका अवलियाने आपल्याला मोटारसायकल येत नाही म्हणून चक्क मजुरीवर चालकच ठेवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या अवलियाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. मोहन चवरे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी दत्ता पवार यांना दुचाकीवर ड्रायव्हर म्हणून नेमलं आहे.  या दोघांची माढा तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्ह्यात सध्या चर्चा आहे.

मोहन चवरे यांनी नवीन मोटार सायकल घेतली. मात्र मोहन यांना मोटार सायकल चालविणे जमलंच नाही. उलट मोटार सायकलवरुन आपण पडू अशी भीती त्यांच्या मनात बसली. त्यामुळे ते झेंगाट नकोच म्हणून त्यांनी आपली मोटार सायकल चालवायला माणूसच ठेवला.

मोहन चवरे हे गेल्या 35 वर्षांपासून माढा शहरात सायकलवरुन पाणी वाटपाचे काम करतात. शहरातील ज्या नागरिकांचा फोन येतो त्यांच्या घरी पाणी वाटप करतात. त्यातूनच ते  आपला उदरनिर्वाह भागवतात. मात्र नातेवाईकांच्या आणि  शहरातील कार्यक्रमांना जायचे झाल्यास त्यांना गाडीवरुन कोण घेऊन जात नव्हते. तेव्हा ते जिद्दीला पेटले आणि नवी दुचाकीच खरेदी केली. मात्र त्यांनी बाईक काही चालवता येईना. गाडी शिकण्यापूर्वीपासूनच त्यांनी दत्ता पवार यांना दुचाकीवर चालक म्हणून नेमलं. आता कोणतीही कामं असली तरी मोहन चवरे हे दत्ता पवारला घेऊन बाईकवरुन जातात.