‘नाचता येईना अंगण वाकडे’, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाणा

| Updated on: Jan 27, 2020 | 11:38 AM

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाचता येईना अंगण वाकडे, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाणा
Follow us on

चंद्रपूर : “नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या पैशांशी केंद्राचा दुरान्वये संबंध नाही. आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका या स्वायत्त आहेत. महानगरपालिकेला स्वत:चं उत्पन्न वाढवण्याचा विशिष्ट कायदा आहे. मग यात केंद्राचा काय संबंध?”, असं म्हणत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar slams Ajit Pawar) यांनी विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

“राज्यातील महापालिका केंद्राच्या चुकीच्या धोरणाने डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर राज्याची दिशा ठरवू”, असे विधान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते. याच विधानावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला (Sudhir Mungantiwar slams Ajit Pawar).

“भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपने गेल्या पाच वर्षात राज्यात चांगली कामं केली आहेत. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आली तर आपल्याला पुढचे 25 वर्षे सरकारमध्ये येता येणार नाही, अशा भीतीमुळे मतभिन्नता असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. एक पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे असं म्हणणारा आहे, तर दुसरा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जगामध्ये कुणी वाईट लिहिणार नाही असं पुस्तक छापणार आहे. ज्यांच्या विचारांमध्ये कोणतीही समानता नाही असे दोन टोकाचे पक्ष आज राज्यामध्ये सत्तेसाठी एकत्र आले आहेत. विकासाची कामं करुन राज्याची प्रगती करणं त्यांच्याकडून होणार नाही”, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

“25 हजार रुपये हेक्टर अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देऊ, असं सांगणारे पक्ष आता गप्प आहेत. एकवेळ जन्मापासून मुका असलेला माणूस बोलायला लागेल मात्र यावर महाविकास आघाडी सरकारचे नेते भाष्य करायला तयार नाहीत”, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

“महाविकास आघाडीचे सरकार बनताच राज्यात बेरोजगारांचे प्रश्न संपले आहेत. मागच्या पाच वर्षात जे लोक बेरोजगारीचा विषय लावून धरत होते ते आता मात्र मंत्री झाले आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांना गावातील बेरोजगारांशी कोणतेही सोयरसुतक राहिलेली नाही. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची विकासाची कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे येता-जाता, उठताबसता प्रत्येक गोष्टीत ते केंद्र सरकारला जबाबदार ठरवतात”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.