निसर्गाचा आवाज निसर्गात विलीन, ठकाबाबांचं निधन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

अकोले (अहमदनगर) : जंगलातील प्राणी-पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारे अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड उर्फ ठकाबाबा यांचं आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आदिवासी समाजातील ‘कांबडनृत्य’ ठकाबाबांमुळे देशाच्या राजधानीत पोहोचलं. आदिवासी भाहातील बोहडा’लोककला जोपासण्याचे कामही ठकाबाबांनी केले. तसेच, वन्य पशु-पक्षांचे हुबेहूब आवाज ते काढत असत. भंडारदरा धरणाजवळील खेड उडदावणे या […]

निसर्गाचा आवाज निसर्गात विलीन, ठकाबाबांचं निधन
Follow us on

अकोले (अहमदनगर) : जंगलातील प्राणी-पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारे अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड उर्फ ठकाबाबा यांचं आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आदिवासी समाजातील ‘कांबडनृत्य’ ठकाबाबांमुळे देशाच्या राजधानीत पोहोचलं. आदिवासी भाहातील बोहडा’लोककला जोपासण्याचे कामही ठकाबाबांनी केले. तसेच, वन्य पशु-पक्षांचे हुबेहूब आवाज ते काढत असत.

भंडारदरा धरणाजवळील खेड उडदावणे या अत्यंत दुर्गम अशा आदिवासी भागात ठकाबाबांचा 1932 साली जन्म झाला. लहानपणापासूनच जंगलात वाढल्याने, तेथील निसर्गाशी एकसंध होत, निसर्गाची भाषा ते शिकले होते. पशु-पक्ष्यांतच्या आवाजसोबतच अंगात विनोदवृत्ती असल्याने, भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ठकाबाबा कायम आकर्षणाचं केंद्र असे.

ठकाबाबांचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे, ते जीभ नाकाच्या शेंड्याला टेकवत, नागफणा काढून दाखवत. चेहऱ्याची बाह्य रचना बदलेपर्यंत ते कसरती करत.

प्रयोगशील शिक्षण भाऊसाहेब चासकर यांच्याकडून आदरांजली

“ठकाबाबा, तुम्ही गेलात आणि अनेक आठवणी आज रुंजी घालताय. कितीतरी वेळेस भेटलो आपण. ठकाबाबा, तुमच्यासोबत माझी ओळख असल्याचा सदैव अभिमान वाटत होता. तुम्ही केवढे मोठे अचाट, अफाट क्षमतेचे, गुणवत्तेचे प्रतिभाशाली कलावंत होतात, हेच कोणाला नीट उमजलं नाही!

तुम्हाला सन्मानानं जगता येईल, असं काहीही आम्ही करु शकलो नाही, याचं दुःख मनाला टोचत राहील. वृद्ध कलावंत पेंशनची केस तशीच तरंगत राहिली होती. आता अनेक लोकं लिहितील, बोलतीलही. अगदी भरभरुन. त्याचा काय उपयोग? आयुष्याच्या संध्याकाळी तुम्ही किती आगतिक, हतबल झाला होतात तुम्ही. बघवत नव्हते ते. तुमच्या सारख्या गुणी कलावंताची अशी दशा, परवड अत्यंत त्रासदायक वाटत होती.

तुमच्यापेक्षा सुमार लोक भरपूर कमावत आहेत, प्रतिष्ठासंपन्न नीट आयुष्य जगत आहेत. मात्र, तुम्ही शापित प्रतिभावंत म्हणून वंचित राहिलात. निसर्गाच्या कुशीत तुम्ही जे काही कमावलं होते त्याचे म्हणावे तेवढे चीज नाही झाले… याचा विषाद वाटतोय. विपन्नावस्थेत असं तुमचं जगणं आणि जाणं दुःखद आहे. भावपूर्ण आदरांजली.” -भाऊसाहेब चासकर, प्रयोगशील शिक्षक, अकोले

बिबट्याच्या डरकाळ्या असो वा मोरांचा आवाज, इथपासून ते धुंवाधार बरसणारा पाऊस, वारा, धबधब्यांचा आवाज, नदी-नाल्यांचा खळखळाट असो, निसर्गाच्या या चमत्कारांचा हुबेहूब आवाज काढण्याची चमत्कारिक कला ठकाबाबांना अवगत होती. याच प्रतिभेच्या जोरावर ठकाबाबा देशाच्या राजधानीपर्यंत जाऊन आले.

1965 साली प्रजासत्ताक दिनी आदिवासी कलाकारांचं पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांकही पटकावला होता. या कलापथकात ठकाबाबाही सहभागी होते. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते ठकाबाबा यांचा सुवर्णपदकाने सन्मान झाला होता.