टीव्ही 9 समोर बसून कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा पाहिली, आता बँकांवर कारवाई

मुख्यमंत्र्यांसमोर होकारार्थी मान हलवणाऱ्या बँका शेतकरी कर्ज मागतात तेव्हा खरा चेहरा दाखवतात. सर्व काम सोडून शेतकरी बँकेच्या फेऱ्या मारतात, पण त्यांची व्यथा ऐकणारं कुणीही नसतं. हेच भीषण वास्तव टीव्ही 9 मराठीने समोर आणलं

टीव्ही 9 समोर बसून कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा पाहिली, आता बँकांवर कारवाई
| Edited By: | Updated on: Jul 09, 2019 | 9:39 PM

मुंबई : शेतकऱ्यांना अवघ्या काही हजारांचं पीक कर्ज देण्यासाठी बँका कशी टाळाटाळ करतात याचं वास्तव टीव्ही 9 मराठीने समोर आणलंय. कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी टीव्हीसमोर बसून हे वास्तव पाहिलं आणि त्यानंतर बँकांवर कारवाईचं आश्वासनही दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना शेतकऱ्यांच्या बाबतीत स्पष्ट आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर होकारार्थी मान हलवणाऱ्या बँका शेतकरी कर्ज मागतात तेव्हा खरा चेहरा दाखवतात. सर्व काम सोडून शेतकरी बँकेच्या फेऱ्या मारतात, पण त्यांची व्यथा ऐकणारं कुणीही नसतं. हेच भीषण वास्तव टीव्ही 9 मराठीने समोर आणलं. यानंतर आता राज्यातील विविध नेत्यांनीही टीव्ही 9 मराठीचे आभार मानत बँकांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

पीक कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर काय होतं याचं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9 मराठीने केलं. उस्मानाबादचं उदाहरण पाहा. स्टेट बँकेत आमच्या प्रतिनिधीने ही पडताळणी केली. त्यावेळी झालेला संवाद :

रिपोर्टर – मॅडम पीक कर्ज हवं होतं

बँक कर्मचारी –  कोणतं गाव?

रिपोर्टर – उस्मानाबाद

बँक कर्मचारी – उस्मानाबाद शहर आणि गाव आमच्याकडे नाही

रिपोर्टर – मागच्या वेळी आपल्या बँकेत कर्ज घेतलं होतं

बँक कर्मचारी – पण आता उस्मानाबाद आमच्याकडे नाही

रिपोर्टर – तेव्हा होतं का?

बँक कर्मचारी – आता नाही आमच्याकडे

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनेही शेतकऱ्याला कर्ज देण्यास कसं निमित्त शोधलं ते यानिमित्ताने दिसून आलं. यानंतर आमची टीम नांदेडकडे वळली. तिथेही नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असाच काहीसा अनुभव होता. कारण, अजून पीक कर्ज देण्यास सुरुवात केली नसल्याचं बँक अधिकाऱ्याने सांगितलं आणि हात जोडले.

टीव्ही 9 मराठीने मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील उदाहरणं समोर आणली आहेत. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, परिणामी शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून जास्त दराने कर्ज घ्यावं लागतं, नापिकीमुळे हा कर्जाचा बोजा वाढतच जातो आणि शेतकऱ्यासमोर जीवन संपवण्याचा पर्याय समोर दिसतो. विशेष म्हणजे सरकारने कर्जमाफी दिली तरीही त्याचा लाभ मिळत नाही. कारण, बँकांकडून कमी आणि सावकारांकडून जास्त कर्ज घेतलेलं दिसून येतं. सरकारच्या कर्जमाफीमध्ये बँकांकडून घेतलेलं नाममात्र कर्ज माफ झालं तरीही सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा कायम राहतो आणि सावकाराकडे जाण्यासाठी बँका भाग पाडतात हे स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट दिसतं.

VIDEO : पाहा संपूर्ण स्टिंग ऑपरेशन