माझं घड्याळाचं दुकान नाही, घड्याळवाले माझे पार्टनर : उद्धव ठाकरे

| Updated on: Jan 16, 2020 | 2:39 PM

सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी भन्नाट उत्तर दिलं. "माझं घड्याळाचं दुकान नाही, मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

माझं घड्याळाचं दुकान नाही, घड्याळवाले माझे पार्टनर : उद्धव ठाकरे
Follow us on

बारामती : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आज ‘कृषिक’ या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याहस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला. सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी भन्नाट उत्तर दिलं. “माझं घड्याळाचं दुकान नाही, मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

“पवार साहेब मला थोड्या वेळापूर्वी सुप्रिया ताईंनी विचारलं की, तुमचं घड्याळाचं दुकान आहे का? मी म्हटलं दुकान नाही. मात्र, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत”, असं उद्धव ठाकरे बोलताच श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यापुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “ती वेळ जुळून यावी लागते, नाहीतर काही उपयोग नसतो. अशी सगळी चांगली वेळ जुळून आली आहे. योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती आली आहे.”

या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. “मी हेलिरकॉप्टरमधून आल्यानंतर फुलांचे ताटवे बघितले. ते बघितल्यानंतर पहिल्यांदाच मन हरपून गेलं. मला लहानपण आठवलं. आम्ही लहान असताना गच्चीवर स्वत: बाळासाहेबांनी वाफे घेतले होते. या वाफात विविध पिकं असायची”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कृषिक’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख उपस्थित होते.

भारतातील हे पहिलं प्रदर्शन : उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या महिन्यात पवार साहेबांनी प्रेमाने आणि आग्रहाने आमंत्रण दिलं होतं. मी विचार करत होतो की, कृषी प्रदर्शनाला काय वेगळं असेल? असं नाही की, मी कृषीप्रदर्शन पाहिलेले नाहीत. मुंबईमध्येही कृषी प्रदर्शने होतात. मोठे स्टॉल असतात, देखावा खूप असतो. पण त्यातून नेमंक काय साधलं जातं? हा एक नेमका प्रश्न असतो. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझी कल्पना याबाबतही थोडीशी तशीच होती. पण इथे आल्यानंतर मला कळलं की, जर मी आलो नसतो तर एका मोठ्या अनुभवाला मुकलो असतो. कारण हे प्रदर्शन नुसतं प्रदर्शन नाही, तर प्रात्याक्षिकासह हे प्रदर्शन आहे. अशाप्रकारचं प्रदर्शन दाखवणारं हे भारतातलं पहिलं प्रदर्शन असेल.”

‘चांगल्याला चांगलं म्हणता येत नसेल तर तो करंटेपणा’

“पवार साहेबांनी त्या काळामध्ये विचार केला आणि त्याची मुहूर्तमेढ रोवली. शरद पवार यांनी दिलेल्या प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली. राजकारणात मतभेद असतील. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला हवं. जर चांगल्याला चांगलं म्हणता येत नसेल तर तो करंटेपणा असतो. माळरानावर नंदनवन उभं करुन दाखवणं ही सोपी गोष्टी नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“हजारो वर्षांपासून शेती सुरु आहे. शेतीसमोर संकटं आली तर हातपाय गाळून चालणार नाही. पूर्वीच्या आणि आताच्या लोकसंख्येतही फरक पडलाय. आपण चंद्रावर किंवा मंगळावर जाऊ. पण अद्याप पाण्यावर पर्याय निघलेला नाही. मात्र, कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त दर्जेदार उत्पन्न कसं निघेल हे इथे पाहायला मिळालं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं ही सरकारची जबाबदारी’

“शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. हे काम करण्यासाठी शेतकऱ्यांनी आशीर्वाद द्यावेत’, असंदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.