मृतसाठ्यात असलेल्या उजनीची 10 दिवसात शंभरीकडे वाटचाल

| Updated on: Aug 06, 2019 | 7:37 PM

उजनी धरणात सध्या पुणे जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असून दौंडमधून 2 लाख 9 हजार 431 क्यूसेक्सने, तर बंडगार्डनमधून 1 लाख 23 हजार 427 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत धरणात 113 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय.

मृतसाठ्यात असलेल्या उजनीची 10 दिवसात शंभरीकडे वाटचाल
फोटो प्रातनिधीक
Follow us on

सोलापूर : जिल्हाभरात समाधानकारक पाऊस नसला तरी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची (Ujani Dam water level) वाटचाल शंभरीकडे सुरु आहे. पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनीची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणात (Ujani Dam water level) 94.09 टक्के पाणीसाठा झालाय. उजनी धरणात सध्या पुणे जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असून दौंडमधून 2 लाख 9 हजार 431 क्यूसेक्सने, तर बंडगार्डनमधून 1 लाख 23 हजार 427 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत धरणात 113 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय.

उजनीत गेल्या दोन दिवसांपासून दोन लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. तर उजनीतून भीमा नदीपात्रात सव्वा लाख क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आलाय. त्यासाठी उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील दौंडचा विसर्ग लक्षात घेता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

भीमा नदीत वीर धरणातून 78 हजार क्यूसेसचा विसर्ग सुरू आहे. उजनीतून दोन लाख क्युसेक्शने विसर्ग सुरू असल्याने पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर नीरा नदीला पाणी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून टेंभूर्णी-अकलूज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.

पंढरपूर शहरातील व्यासनगर, नारायणनगर येथील 500 कुटुंबाना वारकऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या 65 एकर परिसरात हलविण्यात आले आहे. पंढरपुरातील पूरजन्य परिस्थिती पाहता शहरातील परिस्थती नियंत्रणात रहावी यासाठी  नगरपरिषदेच्या 74 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. पण धरणावर अवलंबून असलेल्या शहरांची मात्र चिंता मिटली आहे. पण शेतात पेरणीसाठी अजूनही पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिथे पेरणी झाली, तिथे आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सात लाख लोकांना 396 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 273 चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाला आश्रय देण्यात आलाय.

सध्या उजनीतील पाण्याचा विसर्ग पाहता भीमा नदीकाठच्या 94 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षातील विक्रम मोडत यंदा उजनी धरणाने 10 दिवसात शंभरीकडे वाटचाल केली. 23 जुलै रोजी उजनी धरण वजा पातळीत होतं. मात्र 5 आगस्टला धरणातून एक लाख क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलं. बुधवारी उजनी शंभर टक्के भरण्याचा अंदाज आहे.