यूपीएससीच्या मुलाखतीत नापास झालं तरीही नोकरी मिळणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली : देशातली सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससीमध्ये लवकरच नवे बदल होण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र मेहनत करुन उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होतात. पण अनेक उमेदवार मुलाखतीमध्ये नापास होतात, काही जण अवघ्या एक ते दोन गुणांनीही संधी गमावून बसतात. त्यामुळे मुलाखतीत नापास झालेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी लवकरच नवी योजना आणणार आहे. मुलाखतीत नापास […]

यूपीएससीच्या मुलाखतीत नापास झालं तरीही नोकरी मिळणार!
Follow us on

नवी दिल्ली : देशातली सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससीमध्ये लवकरच नवे बदल होण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र मेहनत करुन उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होतात. पण अनेक उमेदवार मुलाखतीमध्ये नापास होतात, काही जण अवघ्या एक ते दोन गुणांनीही संधी गमावून बसतात. त्यामुळे मुलाखतीत नापास झालेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी लवकरच नवी योजना आणणार आहे. मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नोकरी दिली जाईल.

मुलाखतीत जे विद्यार्थी यशस्वी होत नाहीत, त्यांचीही भरती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने केंद्रीय मंत्रालये आणि विविध एजन्सीजना केली आहे. यूपीएससीचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास अवघ्या काही गुणांनी संधी हुकलेल्या मुलांसाठी नवी आशा निर्माण होईल.

न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेन यांनी याबाबत माहिती दिली आहे. यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांनी भरती करण्याचा प्रस्ताव दिलाय, जे नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखतीच्या फेरीमध्ये बाद होतात. ओदिशामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या संमेलनात बोलताना त्यांनी ही गोष्ट सांगितली.

अरविंद सक्सेना यांच्या मते, एक वर्षात जवळपास 11 लाख उमेदवार यूपीएससीच्या परीक्षेत सहभाग घेतात. नंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत झाल्यानंतर 600 उमेदवारांची निवड होते. अनेक उमेदवार शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, पण रँक येत नाही. सरकारकडून या मुलांबाबत विचार केला जाऊ शकतो. कारण, ते अगोदरच अत्यंत कठीण प्रक्रियेतून अंतिम टप्प्यापर्यंत आलेले असतात. हा प्रस्ताव मान्य झाल्यास परीक्षार्थींचा तणाव कमी करण्यास मदत होईल. शिवाय त्यांच्यात नोकरी करण्याची आशाही जीवंत राहिल, असं अरविंद सक्सेना म्हणाले.

यूपीएससीची परीक्षा अत्यंत साधी आणि फ्रेंडली बनवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याचंही अरविंद सक्सेना यांनी सांगितलं. येत्या नागरी सेवेच्या पूर्व परीक्षेत परीक्षार्थींना अर्ज मागे घेण्याचाही पर्याय दिला जाणार आहे. शिवाय ऑनलाईन परीक्षा घेण्याचा प्रयत्नही यूपीएससीकडून केला जाणार असल्याचं ते म्हणाले.