मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत : विजय वडेट्टीवार

| Updated on: Feb 09, 2020 | 8:04 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली (Vijay Wadettiwar on MNS Maha Morcha).

मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत : विजय वडेट्टीवार
Follow us on

नागपूर : सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनसेच्या महामोर्चावर टीका केली. मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत होता, असं टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडलं. याशिवाय विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली (Vijay Wadettiwar on MNS Maha Morcha).

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आझाद मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सीएए आणि एनसीआर कायद्याचं समर्थन केलं आणि सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी मनसेच्या महामोर्चावर टीका केली.

“मनसेची नेमकी भूमिका काय? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मनसेचा आजचा मोर्चा भाजप पुरस्कृत होता. भाजपची सध्याची परिस्थिती जल विना मासळी अशी झाली आहे. त्यामुळे हे सगळं सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे आज त्यांची स्तुती करत आहेत”, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे ते वारा वारा फिरत आहेत”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रात जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत वडेट्टीवार यांना विचारलं असता, “बॉसचा फोन आला तर त्यांना जावंच लागेल. इथे आता पाच वर्षे काहीच संधी नाही. भाजपचं ऑपरेशन लोटस वगैरे काहीही चालणार नाही. आता आम्हीच ऑपरेशन सुरु करणार आहोत. आमचे जे नेते भाजपात गेले आहेत त्यांची घरवापसी होईल आणि भाजप खाली होईल. त्यामुळे सत्ता हवी असं वाटत असेल तर फडणवीसांनी दिल्लीत जावं”, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.

Vijay Wadettiwar on MNS Maha Morcha