भर चौकात कॅनमधून दारु विक्री, पतीच्या व्यसनाला कंटाळून महिलेची शक्कल

| Updated on: Feb 21, 2020 | 4:04 PM

वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असली तरी छुप्या मार्गाने येथे मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते. त्यामुळे महिलेने अशा अवैध दारुविक्रेत्यांविरोधात खुद्द दारु विकत एल्गार पुकारला (Wardha woman protest against alcohol).

भर चौकात कॅनमधून दारु विक्री, पतीच्या व्यसनाला कंटाळून महिलेची शक्कल
Follow us on

वर्धा :  पती आणि मुलाच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून वर्धा जिल्ह्याच्या वायफड येथील एका महिलेनं भर चौकात दारु विक्री सुरु करत अनोखं आंदोलन केलं. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असली तरी छुप्या मार्गाने येथे मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते. त्यामुळे महिलेने अशा अवैध दारुविक्रेत्यांविरोधात खुद्द दारु विकत एल्गार पुकारला (Wardha woman protest against alcohol). अखेर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेची समजूत घालत अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करु, असं आश्वासन दिलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

वायफडच्या भर चौकात महिला एक कॅन आणि ग्लास घेऊन ओट्यावरती बसली होती. झाडाच्या आडोश्याला बसलेल्या या महिलेकडे गावकऱ्यांचे फारसे लक्षदेखील नव्हतं. पण एक-दोन तास उलटल्यावर भर दुपारी तिच्या अवती-भवती गर्दी जमायला लागली. उत्सुकता म्हणून गावातील काही सुजाण नागरिकांनी विचारपूस केली. या विचारपूसमध्ये एक वेगळीच गोष्ट समोर आली. महिला चक्क दिवसाढवळ्या चौकात गावठी दारु विकत होती. काही दारुड्यांनी तिच्याकडून दारु विकतही घेतली. अवैध दारुविक्रेत्यांच्याविरोधात महिलेने खुद्द दारु विकत एल्गार पुकारला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी जात  त्यांनी महिलेची समजूत घालत अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं.

अवैध दारुविक्रेत्यांविरोधात असं अनोखं आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आशाबाई आनंदराव उईके (45) असं आहे. त्यांचा उदरनिर्वाह मोलमजुरीतून चालतो. त्यांच्या घरी पती, एक मुलगा आणि मुलगी असं कुटुंब आहे. मात्र, पती दारुशिवाय राहू शकत नाही. त्यांच्या मुलालाही दारुचं व्यसन आहे. वडील आणि मुलगा दोघेही रोज दारु पितात. दारुमुळे घरात दररोज वाद होतो.

नवरा आणि मुलाच्या त्रासाला आशाबाई उईके या कंटाळल्या आहे. त्या एकट्याच मेहनत करुन घर चालवत आहेत. मुलीचे लग्न जुडले तर पैसे लागणारच. पण घरातील करते पुरुष दारुच्या आहारी गेल्याने आशाबाईंचा पारा चढला. गावात दारुविक्री थांबावी यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. पण दारुविक्रेते थांबले नाहीत. दारुबंदी झाली नाही.

अखेर आशाबाईंनी आक्रमक पवित्रा घेत स्वतःच दारुविक्रीच्याविरोधात एल्गार पुकारला (Wardha woman protest against alcohol). हातात दारुचं कॅन घेऊन ही महिला चौकात पोहचली आणि दारु विकायला लागली. एक-दोन तासात ग्राहकही वाढले. पण अचानक हे दारुविक्री विरुद्धचे आंदोलनच असल्याचे दारुड्यांच्याही लक्षात आले. पुलगाव पोलिसांनी दारुबंद केली नाही तर आपण बाजारातील मुख्य चौकात दारु विकू, अशी भूमिकाच या महिलेने घेतली आहे.

दरम्यान, आशाबाईंच्या आंदोलनाची माहिती मिळताच पुलगाव पोलीस गावात पोहचले. पोलिसांनी गावात पोहचल्यावर आशाबाईंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून वायफड येथील सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आशाबाईंची समजूत काढण्यात आली. दारु विक्रेत्यांवर निशाणा साधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पुलगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी यांनी दारुविक्रेत्यांची नावे सांगण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, आशाबाईंनी या आंदोलनादरम्यान विक्रीकरिता आणलेल्या कॅनमध्ये दारु नसून पाणी असल्याचं स्पष्ट केलं.