सिझेरियन करताना पोटात कापूस राहिल्याने महिलेचा मृत्यू

| Updated on: Aug 03, 2019 | 8:45 AM

सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर कापसाचा बोळा पोटात राहिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे घडली.

सिझेरियन करताना पोटात कापूस राहिल्याने महिलेचा मृत्यू
Follow us on

औरंगाबाद : सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर (Cesarean) कापसाचा बोळा पोटात राहिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे घडली. तनुश्री ऋषीराज तुपे असं मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद येथील गंगापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात 23 जुलै रोजी गर्भवती महिलेस प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉ. रवींद्र ठवाळ यांनी त्यांची सिझेरियन (Cesarean) प्रसूती केली. तीन दिवसानंतर तनुश्रीला जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. यामुळे त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र उपचारादरम्यान 28 जुलैला तनुश्रीचा मृत्यू झाला.

यानंतर शवविच्छेदन अहवालात तनुश्रीचा मृत्यू सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान कापसाचा बोळा पोटात राहिल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे नातेवाईकांनी डॉ. रवींद्र ठवाळ यांच्या निष्काळजीपणामुळे तनुश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. डॉक्टरांवर कर्तव्यात कसूर आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तनुश्री तुपे यांना त्यांच्या पश्चात दोन मुले असून एक मुल केवळ 10 दिवसांचे आहे. या घटनेने सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा त्याच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरी पेशावर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.