CCTV कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक गायब; गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलावात बुडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

| Updated on: Sep 11, 2022 | 10:39 PM

शनिवारी गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या कृत्रिम तलावातील पाण्यात पोहण्यासाठी या परिसरातली काही मुलं गेली होती. यापैकी राजवीर नितीन बेलेकर हा सहा वर्षीय मुलगा या तलावातील पाण्यात बुडाला.

CCTV कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक गायब; गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलावात बुडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Follow us on

ठाणे : गणेश विसर्जनानंतर उल्हासनगरमध्ये(Ulhasnagar) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कृत्रिम तलावात बुडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.

उल्हासनगरच्या हिराघाट परिसरात उल्हासनगर महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केला होता. या तलावात दहा दिवस गणेश विसर्जन करण्यात आलं. अनंत चतुर्थीपर्यंत येथे सुरक्षारक्षक तैनात होते. तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
मात्र दहा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर महापालिकेनं येथील सुरक्षारक्षक आणि कॅमेरे हटवले. मात्र, कृत्रिम तलावातील पाणी मात्र तसंच ठेवण्यात आले.

शनिवारी गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या कृत्रिम तलावातील पाण्यात पोहण्यासाठी या परिसरातली काही मुलं गेली होती. यापैकी राजवीर नितीन बेलेकर हा सहा वर्षीय मुलगा या तलावातील पाण्यात बुडाला.

राजवीर घरी न परतल्यानं त्याच्या घरच्यांनी रात्रभर शोधाशोध केली. अखेर परिसरातली काही मुलं कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेल्याचं समजताच राजवीरच्या नातेवाईकांनी या तलावाजवळ धाव घेतली.

यावेळी कृत्रिम तलावात राजवीरचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर राजवीरच्या कुटुंबीयांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. सुरक्षारक्षक आणि CCTV कॅमेरे हटवण्यापूर्वी तलावातील पाण्याचा काढून तलाव रिकामा केला नाही. तलाव रिकामा केला असता, तर राजवीरचा जीव वाचला असता, असा संताप राजवीरच्या नातेवाईकांसह नागरिकांनी व्यक्त केला.

या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजवीरचा मृतदेह ताब्यात घेतला. राजवीरचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे महापालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी राजवीरचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संध्याकाळी उशिरापर्यंत राजवीर याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता.