जीवघेणा सिग्नल आता ट्रॅफिक फ्रेंडली होणार ? ‘ब्लॅक स्पॉट’ वर गतिरोधक, रंबल स्ट्रीप बसविण्यास सुरूवात

| Updated on: Oct 13, 2022 | 3:44 PM

नाशिक शहरात झालेल्या बस अपघातानंतर नाशिक महानगर पालिकेच्या वतीने ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

जीवघेणा सिग्नल आता ट्रॅफिक फ्रेंडली होणार ? ब्लॅक स्पॉट वर गतिरोधक, रंबल स्ट्रीप बसविण्यास सुरूवात
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक मधील ट्रक आणि बसमध्ये (Accident) झालेल्या अपघातानंतर प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अपघातस्थळी पाहणी करत प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेऊन असल्याने तातडीने अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शहरातील अपघात क्षेत्र ओळखून 14 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी पाहणी करत ब्लॅक स्पॉट स्थळी काय उपाययोजना करायच्या याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक महानगर पालिकेचे (NMC) आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी याबाबत कठोर पाऊले उचलले आहेत. मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या अपघातस्थळी प्रथम उपाययोजना केल्या जात आहे.
नाशिकच्या मिर्ची हॉटेल चौफुली येथे गतिरोधक आणि खडखडाट पट्टी म्हणजेच रंबल स्ट्रीप बसविण्यास सुरुवात झाली आहे.

याशिवाय मिर्ची हॉटेल चौफुलीवर फॅनिंगचे काम देखील सुरू करण्यास सुरुवात झाली असून तपोवनच्या बाजूने असलेले अतिक्रमण काढून या कामास सुरुवात झाली आहे.

या चौफुलीच्या चहूबाजूने अतिक्रमण आणि शेड मोठ्या प्रमाणात होते ते काढण्यासाठी नगरनियोजन आणि अतिक्रमण विभागाने नोटिसा बजवल्या होत्या.

नोटिसा मिळताच नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी लवकरच काढू अशी भूमिका घेतली आहे.

याशिवाय गतिरोधक, रंबलर बसविण्यात आल्या नंतर अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे.

याच धर्तीवर मिर्ची हॉटेल ते निफाड – येवल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहर हद्दीत सिद्धिविनायक लॉन्स चौफुली ते नांदूर नाका चौफुली येथेही अंमलबजावणी केली जाणार आहे.

या तिन्ही ठिकाणी पालिकेकडून काम पूर्ण झाल्यावर निरीक्षण करूनच पुढील ब्लॅक स्पॉटवर काम करण्याची हालचाल पालिकेचे अधिकारी करीत आहे.

शहर अपघात मुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने संपूर्ण प्रयत्न करणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.