Nashik | नाशिकमध्ये कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; 334 जणांवर उपचार सुरू, आजपासून 24 तास लसीकरण

| Updated on: Dec 13, 2021 | 6:05 PM

नाशिकमध्ये कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सध्या 334 रुग्णांवर उपचार सुरू सुरू आहेत. त्यात महापालिका हद्दीत 151 आणि ग्रामीण भागातील 169 जणांचा समावेश आहे.

Nashik | नाशिकमध्ये कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; 334 जणांवर उपचार सुरू, आजपासून 24 तास लसीकरण
सांकेतिक फोटो
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सध्या 334 रुग्णांवर उपचार सुरू सुरू आहेत. त्यात महापालिका हद्दीत 151 आणि ग्रामीण भागातील 169 जणांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 826 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 29, बागलाण 08, चांदवड 05, देवळा 04, दिंडोरी 11, इगतपुरी 19, कळवण 03, मालेगाव 02, नांदगाव 01, निफाड 38, सिन्नर 22, त्र्यंबकेश्वर 03, येवला 24 अशा एकूण 169 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 151, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 08 रुग्ण असून, असे एकूण 334 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 897 रुग्ण आढळून आले आहेत.

लसीकरणाकडे पाठ

नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे प्रशासन लसीकरण जास्त करण्यावर भर देत आहे.

आजपासून 24 तास लसीकरण

नाशिकमध्ये वाढणारे कोरोनाचे रुग्ण आणि ओमिक्रॉनची विषाणूची भीती यामुळे शहरात 24 तास लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सोमवारपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे. सध्या नाशिकरोडला खोले मळा, वडनेर दुमाला, जेलरोड, सिन्नर फाटा, उपनगर, गंधर्वनगरी या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत लसीकरण सुरू असते.

सुरक्षित अंतर पाळा

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. कारण तूर्तास तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आणि मास्क हेच दोन पर्याय आहेत.

तर ठोठावणार दंड

सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्यांनाच धडकी भरवलीय. त्यात नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच. लसीकरणाची गती संथ झालीय. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसावा म्हणून प्रशासन आक्रमक झाले आहे. त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. तुम्ही मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड करण्यात येणार आहे.

इतर बातम्याः

Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम

Raj Thackeray | अचानक OBC आरक्षणाचा विषय आला कसा, राज ठाकरेंचा सवाल ? नेमकं कुठं पाणी मुरतंय…