Aurangabad | औरंगाबाद ही एमआयएमची जहागिर आहे का? आमदार अंबादास दानवे यांचा सवाल!

| Updated on: Jul 12, 2022 | 2:57 PM

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरून एमआयएमच्या वतीने विरोध केला जातोय, यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले, ' एमआयएम काय जाहागिरदार आहे का? त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे?

Aurangabad | औरंगाबाद ही एमआयएमची जहागिर आहे का? आमदार अंबादास दानवे यांचा सवाल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः  औरंगाबादच्या नामांतरावरून (Aurangabad Name change) राजकारण तापू लागले आहे. एमआयएम ही जातीयवादी संघटना आहे, ते औरंगजेबाला आदर्श मानतात, अशी जोरदार टीका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. ते औरंगजेबच्या कबरीवर लोटांगण घालायला जात असतात त्यामुळे त्यांनी विरोध करणे यात काही गैर नाही असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरून एमआयएम आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आज औरंगाबादमध्ये निषेध मोर्चा काढला जात आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीदेखील या मुद्द्यावरून शिवसेनेसह, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धारेवर धरलं आहे. शिवसेनेचा हाच अजेंडा होता, पण महाविकास आघाडीतीली काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री कॅबिनेट बैठकीत गप्प का बसले, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यावरून औरंगाबादेत आज मोठा मोर्चा काढला जात आहे. त्यानंतर कर्टात धाव घेणार असल्याची माहितीही खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

अंबादास दानवे काय म्हणाले?

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरून एमआयएमच्या वतीने विरोध केला जातोय, यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘ एमआयएम काय जाहागिरदार आहे का? त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? संभाजी महाराज का नको आणि औरंगजेब का पाहिजे, हे सांगावं त्यांनी. चुकीचा इतिहास मिटवलाच पाहिजे. हे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे जनतेनं त्यांचे आभार मानले पाहिजेत. हे फक्त राजकारण केलं जातंय. एमआयएमचा मुस्लिम जनाधारही कमी होतोय. त्यांचं काम नाही. आमदार, खासदार, नगरसेवकांनी काही केलं नाही. मग आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पाऊल म्हणून एमआयएम संभाजीनगर नावाला विरोध करतेय. हा विरोध कालांतराने निश्चित संपेल..असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.

1 हजार कोटी रुपयांचा हिशोब कुणी केला?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतरावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. शहराचं नाव बदललं तर सर्व प्रमाणपत्रांवरून ना बदलण्यासाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा खर्च लागू शकतो, हा निधी कोण देणार? असा सवालही त्यांनी केलाय यावरून अंबादास दानवे म्हणाले, ‘ नामांतराला1 हजार कोटीचा हिशोब कोणी काढलाय ? अनेक शहरांचे नामांतर झाले, त्याला काय 1 हजार कोटी लागले का? बॉम्बेचं मुंबई झालं. एवढ्या मोठ्या शहराचं नाव बदललं, मग त्यासाठी दहा हजार कोटी लागले का, असा सवालही त्यांनी केलाय. जे जे करावे लागेल ते ते आम्ही करू, त्यांनी एक पाऊल उचलले तर आम्ही दोन पावले उचलू असा इशारा दानवे यांनी दिलाय.