आता पुन्हा पाऊस येणार; नाशिकसाठी मुसळधार अंदाज

| Updated on: Nov 07, 2021 | 12:46 PM

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

आता पुन्हा पाऊस येणार; नाशिकसाठी मुसळधार अंदाज
Follow us on

नाशिकः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या चोवीस तासांमध्ये नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी लांबणार आहे.

नाशिक जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात पावसाने झोडपून काढले. त्यात ऐन दिवाळीत शुक्रवार, शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे. आता दिवाळीनंतर तरी थंडी वाढेल असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. त्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 10 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये सोमवारी, तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आणि यानामध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थंडी लांबणार

उत्तर महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी थंडी वाढली होती. 30 ऑक्टोबर रोजी नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजीही नाशिकमध्ये राज्यात नीचांकी अशा 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडी वाढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता अचानक हवामान बदल झाला. आता 9 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता होती. पण पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता असल्याने थंडी लाबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान बदलाचे परिणाम

नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत. (Chance of heavy rains in Nashik, low pressure area in Arabian Sea)

इतर बातम्याः

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक

100 टक्के लसीकरणासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाईन; नाशिक विभागातल्या मोहिमेला पुन्हा गती!