सायरस मिस्त्रींना एअरबॅग वाचवू शकली असती, पण का उघडली नाही? थेट मर्सिडिजला विचारण्यात आलेले 6 प्रश्न

| Updated on: Sep 06, 2022 | 11:22 AM

सायरस मिस्त्री बसले होते, तेथील एअरबॅग अपघाताच्या वेळी उघडली असती तर प्राणहानी टळली असती, असे म्हटले जात आहे. त्यासाठीच मर्सिडिजमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या का, यासाठी खुलासे मागवण्यात आले आहेत.

सायरस मिस्त्रींना एअरबॅग वाचवू शकली असती, पण का उघडली नाही? थेट मर्सिडिजला विचारण्यात आलेले 6 प्रश्न
Image Credit source: PTI
Follow us on

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचा (Cirus Mistry) अपघात ज्या मर्सिडिज (Mercedes) कारमध्ये झाला, तिची एअरबॅग वेळेवर उघडली असती तर कदाचित मिस्त्री यांचे प्राण वाचले असते, असं म्हटलं जातंय. ही एअरबॅग (Airbag) का उघडली नाही, यावरून आता कार क्षेत्रातील तंत्रज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरु आहे. तर ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या पालघरच्या पोलीस विभागानेही यासंबंधीचे 6 तांत्रिक प्रश्न विचारले आहेत. मर्सिडिज कंपनीच्या टेक्निकल आणि इंजिनिअरिंग टीमला या प्रश्नांवर लवकरच खुलासा करावा लागणार आहे. पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी विचारलेले सहा प्रश्न कोणते हे पाहुयात….

  1.  एअरबॅग का उघडली नाही?
  2.  कारमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का?
  3. गाडीचे ब्रेक फ्यूइड किती होते?
  4. टायरचे प्रेशर किती होते?
  5. अनेक कार योग्य तपासण्या केल्यानंतरच प्लांटमधून बाहेर पडतात. त्यात मर्सिडिजच्या अपघाताच्या शक्यतेविषयी काही अहवाल आहे का?
  6. अपघात झाल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाले होते का?

तांत्रिक प्रश्न पडण्याचं कारण काय?

मुंबईजवळील पालघर येथील चरोटी गावात सूर्या नदीच्या पूलावर सायरस मिस्त्रींच्या कारला अपघात झाला. गुजरातमधून मर्सिडिज (MH-47-AB-6705) कारमध्ये ते प्रवास करत होते. कारमध्ये एकूण चौघे होते. डॉ. अनायता कार चालवत होत्या. त्यांचे पती दरीयस हे समोर शेजारच्या सीटवर होते. तर मागील सीटवर सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले होते.

ही मर्सिडिज पालघरजवळच्या डिव्हायडरला धडकली. मागे बसलेल्या सायरस मिस्त्री आणि त्यांच्या मित्राचा अपघातात मृत्यू झाला. तर पुढील सीटवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. याच अपघातावरून संशय व्यक्त केला जातोय. सायरस मिस्त्री बसले होते, तेथील एअरबॅग अपघाताच्या वेळी उघडली असती तर प्राणहानी टळली असती, असे म्हटले जात आहे. त्यासाठीच मर्सिडिजमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या का, यासाठी खुलासे मागवण्यात आले आहेत.

अपघातावेळी काही चुका घडल्या?

रविवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी झालेल्या या अपघातावेळी कारचालक किंवा प्रवास करणाऱ्यांकडून काही चुका घडल्या का, याचा तपास सध्या सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, सायरस मिस्त्रींची कार खूप वेगात होती. पालघर जिल्ह्यातील चरोटी चौकी पार केल्यानंतर कारने फक्त 9 मिनिटात 20 किमी अंतर पार केले. तसेच मागे बसलेले सायरस मिस्त्री आणि त्यांच्या मित्राने सीटबेल्ट बांधला नव्हता. हा सीटबेल्ट न बांधल्यामुळेच कारमधील एअरबॅग उघडली नाही का, याचाही तपास आता केला जातोय.