आजीले मदत करा दादा… आजी खरं बोली रायनी, या आजीच्या दारापर्यंत शासन येणार का?

| Updated on: Jan 13, 2024 | 5:10 PM

धूळे बस स्टॉपवर एक आजीबाई दररोज प्रवाशांकडून पैसे मागत असते. ही आजी नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या आजीकडे अहिराणी गाण्यांचं वैभव आहे. आम्ही या आजीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही आजी अहिराणी भाषेतील जात्यावरची गाणी बोलत होती. या आजीचं नाव ठगूबाई असं आहे

आजीले मदत करा दादा... आजी खरं बोली रायनी, या आजीच्या दारापर्यंत शासन येणार का?
Follow us on

धुळे | 12 जानेवारी 2024 : राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी‘ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा सर्वसामान्यांना थेट आणि चांगल्या पद्धतीने फायदा देखील होतोय. विशेष म्हणजे राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमातून हजारो गरजूंना मदत मिळत आहे ही या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. पण तरीही आम्ही शासनाच्या निदर्शनास अशी एक व्यक्ती आणून देण्याचा प्रयत्न करतोय जिच्या दारी खरंच योजना पोहोचण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती म्हणजे धुळे बसस्टॉपवर प्रवाशांकडून पैसै मागून उदरनिर्वाह भागवणारी ठगू आजी.

धूळे बस स्टॉपवर एक आजीबाई दररोज प्रवाशांकडून पैसे मागत असते. ही आजी नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या आजीकडे अहिराणी गाण्यांचं वैभव आहे. आम्ही या आजीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही आजी अहिराणी भाषेतील जात्यावरची गाणी बोलत होती. या आजीचं नाव ठगूबाई असं आहे. या आजीला आम्ही कॅमेऱ्यासमोर तिचं गाव विचारलं. पण तिने सुरूवातीला गावाबद्दल नाव सांगितलं नाही. आम्ही तिला शासनाकडून मदत मिळवून देऊ, असं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ही आजी गावाचं नाव सांगायला तयार झाली नाही. याउलट सरकारने दिलं असतं तर मी तुमच्याजवळ तुकडे मागायला आले असते का? असा उलटसवाल ही आजी करते. पुढे बोलताबोलता आम्ही तिला गाव सांगण्यास भाग पाडतो तेव्हा ही आजी आपल्या गावाचं नाव नगाव धमानं असं सांगते. पण आम्हाला सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार या आजीचं गाव धुळे जिल्ह्यातील ढंडाणे असं आहे. तसेच आजीला मुलगा नाही अशी माहिती मिळाली.

आजीसोबत गप्पा मारल्या तेव्हा ही आजी जात्यावरची खूप सुंदर अशी गाणी गात होती. त्यामुळे आम्ही आज जो व्हिडिओ दाखवतोय तो या महाराष्ट्राचं पारंपरिक वैभव आहे. या महाराष्ट्रात संस्कृतीच्या दागिण्यांची खाण आहे. या मातीतलं मौखिक साहित्य पिढ्यानपिढ्या जिवंत आणि शाश्वत आहे. आजच्या जमान्यात घरोघरी घरघंटी आलीय. त्यामुळे जात्यावर दळण दळणारी घरं आज फार दुर्मिळ झाली आहेत. अगदी क्वचित ठिकाणी जात्यावरती दळण दळलं जातं. पूर्वी घरातल्या स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या. यावेळी त्या गाणी म्हणायच्या. मा गाण्यांमध्ये खूप खोलवर अर्थ रूतलेला असायचा. ही गाणी खूप भावस्पर्शी होती. या गाण्यांमध्ये वास्तविक जीवन झिरपलेलं असायचं.

अहिराणी भाषेतल्या जात्यावरच्या गाण्यांमध्ये स्त्री आपल्या वाटेला आलेला संसार, तिचं माहेर, भाऊ, भाऊजयी यांच्याविषयी काव्यमय रूपात बोलत असते. सध्याचा काळ जात्यावरच्या गाण्यांचा राहिला नाही. पण जात्यावरची गाणी अनेक युगांपासून जिवंत आहेत. ही गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत गेली आहेत. आणि हे जपण्याचं काम या ठगू आजीकडून होतंय.

शासन आपल्या परीने खूप चांगलं काम करत आहे. अनेक निराधार नागरिकांना शासनाची मदत होते. त्यामुळे आम्हीसुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून ठगू आजीसारख्या गरजू नागरिकांना मदत मिळवून देण्याचा प्रांजळ प्रयत्न करतोय. धुळे बसस्टॉपवर ठगू आजी आमच्या निदर्शनास आली. हीच ठगू आजी सरकारच्या निदर्शनास आणुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठगू आजीसाठी शासनाची श्रावणबाळ योजना, विधवा योजना तसेच वृद्धांसाठी लागू होणाऱ्या इतर योजनांच्या माध्यमातून मदत मिळाली तर या आजीला बसस्थानकावर कुणाकडून पैसे मागून उदरनिर्वाह भागवण्याची आवश्यकता भासणार नाही.