Presidential Election 2022: निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली महाराष्ट्रातील निवडणूक तयारीची पाहणी; विधानभवनातील सेंट्रल हॉलला दिली भेट

| Updated on: Jul 17, 2022 | 8:50 PM

अग्रवाल यांनी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती घेतली. मतदारांच्या आगमनापासून त्यांची नोंदणी, प्रत्यक्ष मतदान इत्यादी प्रक्रियेसंदर्भात इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर अग्रवाल यांनी स्ट्राँग रुमला भेट देऊन मतपेटी आणि निवडणूक साहित्याची पाहणी केली.

Presidential Election 2022: निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली महाराष्ट्रातील निवडणूक तयारीची पाहणी; विधानभवनातील सेंट्रल हॉलला दिली भेट
विधान भवन...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं (president election) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या 18 जुलै रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू झालं असून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.  राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी निवडणूक तयारीची माहिती घेतली.

अग्रवाल यांनी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती घेतली. मतदारांच्या आगमनापासून त्यांची नोंदणी, प्रत्यक्ष मतदान इत्यादी प्रक्रियेसंदर्भात इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर अग्रवाल यांनी स्ट्राँग रुमला भेट देऊन मतपेटी आणि निवडणूक साहित्याची पाहणी केली.

या पाहणीनंतर अग्रवाल यांनी विधानभवन येथे बैठकीत संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना संबोधीत केले. राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने संबंधीत विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा, मतपेटीची विमानाद्वारे होणारी वाहतूक अशा विविध अनुषंगाने यावेळी माहिती देण्यात आली.

अग्रवाल यांनी आज सकाळी ही भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधीमंडळाचे उपसचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, कोव्हीड अधिकारी तथा आयुक्त (आरोग्य सेवा) डॉ. रामास्वामी एन, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोण होणार राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?

या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत. तर संयुक्त पुरोगामी आघाडीने (UPA) यशवंत सिन्हा यांना उमेदवार केलं आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपतीपदी बसण्याचा मान आदिवासी पहिल्यांदाच मिळणार असल्याने त्यांच्या बाजूने आदिवासी खासदार एकवटले आहेत. दुसरीकडे यशवंत सिन्हा हे संपुआचे उमेदवार आहेत. सिन्हा हे पूर्वी भाजपमध्ये होते. आता तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे भाजपची मते खेचून आणण्यात यशवंत सिन्हा यशस्वी ठरतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे समाजवादी पार्टीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे संपुआत असूनही शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.