नवरात्रोत्सवात पाऊसही गरबा खेळायला येणार! आजपासून पुढचे 4 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

| Updated on: Sep 27, 2022 | 8:57 AM

राज्याच्या काही भागात आजपासून पुढचे चार दिवस पावसाचा यल्लो अलर्ट, पावसाचा इशारा नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी? जाणून घ्या

नवरात्रोत्सवात पाऊसही गरबा खेळायला येणार! आजपासून पुढचे 4 दिवस महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता
पुन्हा पावसाची शक्यता
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अश्विनी सातव डोके, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे. यंदा कोरोना महामारीचं संकट नसल्यानं उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची जय्यत तयारी केली आहे. पण या तयारीत अचानक पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली, तर अनेक मंडळांची तारांबळ उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हवामान विभागातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे आता ऐन पावसात गरबा खेळावा लागण्याची भीती अनेकांना सतावू लागलीय.

राज्याच्या हवामान विभागाने (Weather Report) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस पावसाची शक्यता (Maharashtra Rain Prediction Today) आहे. काही भागात तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा

पावसासाठी पोषक वातावरण

राज्यात पावसासाठी पुन्हा हवामान पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, राज्यात उन्हाची स्थितीदेखील पाहायला मिळतेय. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या उर्वरीत काही ठिकाणीही पावसाची नोंद झालीय. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास थांबलाय. उत्तर पंजाब आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेश आणि परिसरावर देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिलाय.

‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.