Weather Alert : 9 जानेवारीपर्यंत राज्यावर आसमानी संकट, हवामान खात्याकडून इशारा

| Updated on: Jan 07, 2021 | 5:59 PM

दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली आहे. लांजा तालुक्यातील कुवे घाटात अवकाळी पाऊसानं दाणादाण उडवली आहे.

Weather Alert : 9 जानेवारीपर्यंत राज्यावर आसमानी संकट, हवामान खात्याकडून इशारा
Follow us on

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ऐन हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे. आताही राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली आहे. लांजा तालुक्यातील कुवे घाटात अवकाळी पाऊसानं दाणादाण उडवली आहे. (maharashtra weather alert mumbai pune maharashtra rain update imd expected rain till 9th january)

अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला आहे. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. शहापूरमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहापूरमध्ये सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटाने जोरदार वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे वीट भट्टी आणि लागवड केलेल्या भाजी – पाल्यावरसुद्धा अवकाळी पावसाने परिणाम झाला आहे.

इतकंच नाही तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरू होती. अवकाळी पावसानं आंबा व्यवसायीक धास्तावले आहेत. या अवकाळी पावसानं आंबा हंगाम लाबण्याची शक्यता वर्तवली जाते.

खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे (Maharashtra Weather Alert About Rain). तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे.

काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला

मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

राज्यात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (maharashtra weather alert mumbai pune maharashtra rain update imd expected rain till 9th january)

संबंधित बातम्या: 

Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट

weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?

(maharashtra weather alert mumbai pune maharashtra rain update imd expected rain till 9th january)