अबुधाबीत ‘मॅरेथॉन’, मराठमोळ्या मायलेकी नऊवारीत धावल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

अबुधाबी : पारंपरिक दागिने, हातात बांगडया, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. मात्र हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज सातासमुद्रापार असलेल्या अबुधाबी देशातही उठून दिसला आहे. नुकतेच अबुधाबी येथे झालेल्या अ‍ॅडनॉक पुरस्कृत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरी जिल्हयातील दापोलीची सुकन्या डॉ. पल्लवी प्रसाद भांबुरे-बारटके आणि पल्लवीची कन्या पावनी बारटके […]

अबुधाबीत मॅरेथॉन, मराठमोळ्या मायलेकी नऊवारीत धावल्या
Follow us on

अबुधाबी : पारंपरिक दागिने, हातात बांगडया, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. मात्र हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज सातासमुद्रापार असलेल्या अबुधाबी देशातही उठून दिसला आहे. नुकतेच अबुधाबी येथे झालेल्या अ‍ॅडनॉक पुरस्कृत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरी जिल्हयातील दापोलीची सुकन्या डॉ. पल्लवी प्रसाद भांबुरे-बारटके आणि पल्लवीची कन्या पावनी बारटके या दोघींनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. ही मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या यशस्वी सहभागाबद्दल अबुधाबीमधील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, अबुधाबीमध्ये संपन्न झालेल्या मॅरेथॉनमध्ये डॉ. पल्लवी प्रसाद बारटके (भांबुरे) आणि त्यांची कन्या पावनी बारटके यांनी मराठमोळी नऊवारी साडी नेसून सहभाग घेतला आणि यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. अबुधाबी येथे असूनही आपल्या मराठी संस्कृतीमधील सगळे सण, समारंभ, परंपरा सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन, गायन असे कार्यक्रम घेण्यासाठी दापोलीची डॉ.पल्लवी भांबुरे नेहमीच अग्रेसर असते. या स्पर्धेत अबुधाबीस्थित मृण्मयी गुप्ते, प्रज्ञा वाघमारे, कांचन पाटील, पल्लवी अमृतकर, सुरेश वाघमारे, वेद गुप्ते, सिध्दी पाटील, श्रेयस वाघमारे आणि मोहिनी अमृतकर ही मंडळी देखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना आपण खिलाडूवृत्तीने सामोरे गेले पाहिजे. जर असे झाले तरच जीवनात अनेक संघर्ष येऊनही त्यातून आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो आणि जीवनाचा आनंद उपभोगू शकतो अशी प्रतिक्रिया डॉ. पल्लवी भांबुरेंनी दिली.

विशेष म्हणजे आपल्या आईचा आदर्श ठेऊन अंगात ताप असतानाही त्यांची  कन्या पावनी मागे हटली नाही आणि तिने स्पर्धा पूर्ण केली.

आपली संस्कृती खूप समृद्ध आहे म्हणुनच शंभरहून अधिक देशांच्या नागरिकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राचे आणि त्याच माध्यमातून आपली मायभूमी असलेल्या भारताचे नाव उज्वल करण्याच्या हेतूने आम्ही सगळे या स्पर्धेत  सहभागी झाल्याचेही डॉ.पल्लवी यांनी सागितले.

दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. चंदमोहन भांबुरे यांच्या डॉ. पल्लवी या सुकन्या असून सध्या त्या आपल्या कुटुंबासमवेत अबुधाबी येथे वास्तव्यास आहेत.