मनसेच्या महाअधिवेशनावर शिवसेनेचे अनिल परब म्हणतात…

| Updated on: Jan 23, 2020 | 8:47 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज मुंबईत शिवसेना आणि मनसेने कार्यक्रम आयोजित केले आहेत. मनसेचे आज महाअधिवेशन आहे, तर शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आहे.

मनसेच्या महाअधिवेशनावर शिवसेनेचे अनिल परब म्हणतात...
Follow us on

मुंबई : “शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले नाही. शिवसेना उघड भूमिका मांडते. आम्ही भूमिका बदलली नाही. आता दुसरे काय करतात ते माहित नाही. उत्तर भारतीय, गुजरातींबाबत त्यांची भूमिका काय असते, ते हिंदूच आहेत ना? या भूमिकांचा त्यांनी विचार करायला हवा”, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab on MNS Maha Adhiveshan) यांनी केली आहे.

“शिवसेनेचे आज शक्तीप्रदर्शन नाही. आमचा वचनपूर्ती कार्यक्रम आहे. आमची एवढी मोठी ताकद आहे मग तो कार्यक्रम आम्ही षण्मुखानंद सभागृहात कसा करणार? शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षात शिवसेनेची शक्ती सर्वांनी पाहिली आहे”, असा घणाघात अनिल परब यांनी केला. “आमचा दरवर्षी कार्यक्रम असतो. आम्ही ठरवून कार्यक्रम करत नाहीत. यावेळी कार्यक्रमाचं थोडं स्वरुप बदललं आहे. बाकी कोण काय करतंय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही”, असा टोला अनिल परब (Anil Parab on MNS Maha Adhiveshan) यांनी मनसेला लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज मुंबईत शिवसेना आणि मनसेनं कार्यक्रम आयोजित केले आहेत. मनसेचं आज महाअधिवेशन आहे, तर शिवसेनेचा आज वचनपूर्ती सोहळा आहे. मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या कार्यक्रमात बाळासाहेबांसोबत काम केलेल्या ज्येष्ठ 11 शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरेंचा सत्कार केला जाणार आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आमच्यासाठी सण असतो. गेले अनेक वर्षे हा सण आम्ही उत्साहात साजरा करतोय. यंदा या सणाचे महत्त्व वाढलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे आजचा दिवस वचनपूर्ती सोहळा म्हणूनही साजरा करीत आहोत. आज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील. बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते उद्धव ठाकरेंचा सत्कार होईल. याशिवाय हा फक्त शिवसेनेचा कार्यक्रम आहे, सरकारचा कार्यक्रम नाही”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.