बागेत खेळत असलेली मुलगी पळवण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी परप्रांतियाला चोपलं

| Updated on: Jun 21, 2019 | 7:59 PM

बिहारचा राहणारा आरोपी जितेंद्र साहनीसोबत अजून किती लोक आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बागेत खेळत असलेली मुलगी पळवण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी परप्रांतियाला चोपलं
Follow us on

ठाणे : लहान मुलांना खेळण्यासाठी एकटं सोडत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण, डोंबिवलीत हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्सच्या गार्डनमध्ये खेळताना एका 6 वर्षाच्या मुलीला चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय. बिहारचा राहणारा आरोपी जितेंद्र साहनीसोबत अजून किती लोक आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

लहान मुलं बागेत खेळताना एक इसम मुलीजवळ येतो आणि त्या मुलीला तो कडेवर घेतो. डोंबिवली पूर्वेतील कासारिओ कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. या परिसरातील बगीचात काही मुलं आणि मुली खेळत होते. रात्री साडे आठच्या सुमारास एक अनोळखी इसम या आला. त्याने खेळत असलेल्या 6 वर्षांच्या मुलीला हातात घेतलं, पण मुलीच्या मोठ्या बहिणीची नजर त्याच्यावर पडली. जवळच असलेल्या एका मुलीने आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी गोळा झाले आणि त्यांनी मुलगी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पकडून चोप देत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं.

जेव्हा पोलीस या आरोपीला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते तेव्हा जितेंद्र साहनी या आरोपीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी जितेंद्र साहनी याला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे. जितेंद्र बिहारचा राहणारा आहे. त्याच्यासोबत अजून कोणी आहे का? या पूर्वी त्याने असे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

घडलेल्या प्रकारानंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. लहान मुलांना घराबाहेर सोडावे की नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.