मुंबईत ‘गेट वे’जवळ समुद्रात पर्यटक बोट बुडाली, मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवाशांना वाचवलं

| Updated on: Jan 07, 2020 | 1:42 PM

मुंबईच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. पर्यटक बोट बुडून तिला जलसमाधी मिळाली (Mumbai Boat submerged ) आहे. मात्र या बोटीवरील 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

मुंबईत गेट वेजवळ समुद्रात पर्यटक बोट बुडाली, मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवाशांना वाचवलं
Follow us on

मुंबई : मुंबईच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. पर्यटक बोट बुडून तिला जलसमाधी मिळाली (Mumbai Boat submerged ) आहे. मात्र या बोटीवरील 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ रविवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली. पर्यटक बोटीवर (Mumbai Boat submerged )  वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यावेळी अचानक ही बोट बुडू लागली. यावेळी बोटीत 50 जण होते. त्यामुळे एकच धावपळ सुरु झाली.

बोट बुडत असल्याचं लक्षात येताच उपस्थित मच्छिमारांनी बोटीवरील 50 जणांना मोठ्या धाडसाने वाचवलं. गेट वे ऑफ इंडियाजवळ हा सुटकेचा थरार सुरु होता, मात्र पोलीस, तटरक्षक दल या घटनेबाबत अनभिज्ञ होते.

बोटीत पाणी येत असल्याने पर्यटक घाबरले. पर्यटकांनी आरडाओरड केल्याने गेट वे जवळच्या अन्य बोटींना या दुर्घटनेची माहिती समजली. काही पर्यटकांनी उड्या मारुन जीव वाचवला. तर स्थानिक कोळ्यांनी पर्यटकांची सुटका केली. या बोटीला परवानही होती का याची चौकशी सुरु आहे.

टाइस नावाच्या कॅटामरान बोटीतून 35 पाहुणे आणि 10 कर्मचारी प्रवास करत होते. गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर भर समुद्रात वाढदिवसाचा जल्लोष सुरु असताना बोटीत पाणी भरायला सुरुवात झाली आणि एकच गोंधळ उडाला. सर्वांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला.

अष्टविनायक मदतीला

सुदैवाने एलिफंटा बेटाजवळ ‘अष्टविनायक’ बोटीतील कर्मचाऱ्यांनी बुडणारी बोट आणि प्रवाशांचा आक्रोश ऐकला आणि ते मदतीला धावले. बुडणाऱ्या टाईस बोटीतील सर्व 50 जणांची सुटका करण्यात आली. भीतीमुळे गाळण उडालेल्या अनेक प्रवाशांची तब्येतही बिघडली होती.

या घटनेनंतर पार्टीचे आयोजक आणि बोटीवरील मॅनेजर पसार आझले आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाचा कोणताही गुन्हा अद्याप नोंदवलेला नाही.