एक्स्प्रेस वे आता 8 पदरी होणार, कळंबोली ते लोणावळा प्रवास अक्षरशः हवेतच

| Updated on: Jun 12, 2019 | 10:01 PM

अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून पुणे आणि मुंबई दरम्यानचं अंतर कापणं यामुळे शक्य होणार आहे. त्यासाठी दोन महाकाय बोगदे आणि तेवढेच मोठे पूल बांधले जाणार आहेत.

एक्स्प्रेस वे आता 8 पदरी होणार, कळंबोली ते लोणावळा प्रवास अक्षरशः हवेतच
Follow us on

पुणे : वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा पुणे आणि मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस वेवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता खऱ्या अर्थाने एक्स्प्रेस राहिलेला नाही. मात्र ही वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारकडून या एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून पुणे आणि मुंबई दरम्यानचं अंतर कापणं यामुळे शक्य होणार आहे. त्यासाठी दोन महाकाय बोगदे आणि तेवढेच मोठे पूल बांधले जाणार आहेत.

कसा असेल नवा रस्ता?

कळंबोली टोल नाक्यापासून हा आठ पदरी रस्ता सुरु होईल. या रस्त्याने साधारणतः सात किलोमीटर अंतर चढून तुम्ही ओडोशी गावाजवळ याल आणि ईथे 700 मीटर लांबीचा पूल सुरू होईल.

शेकडो मीटर खोल दरीमध्ये खांब उभे करून हा पूल उभारण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे- वरळी सी लिंकसाठी वापरलेलं तंत्रज्ञान त्यासाठी वापरलं जाणारं आहे. ऑफकॉम या शापूरजी- पालनजी कंपनीशी संबंधित कंपनीला या प्रकल्पातील दोन्ही पुलांच्या बांधणीचं काम देण्यात आलंय.

पहिला बोगदा चावणी गावाजवळ असलेल्या डोंगरांमध्ये संपेल आणि ईथून पुढं पुन्हा एक पूल सुरू होईल. खाली पाहिलं तर डोळे फिरतील एवढ्या खोल दरीमध्ये खांब उभे करुन हा पूल उभारला जाईल. हा पूल थेट नागफणीच्या सुळक्याला जोडला जाईल. नागफणीच्या सुळक्याची पूर्वेकडची बाजू आतापर्यंत एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताना दिसायची. पण या नव्या पुलावरून प्रवास करताना नागफणीची पश्चिमेकडची बाजू प्रवाशांना स्पष्टपणे दिसणार आहे.

प्रवासात ऐतिहासिक स्थळही पाहता येणार

ज्या ठिकाणाहून हा बोगदा जाईल त्या चावणी गावच्या परिसरात एक सोनेरी इतिहास दडलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी करतलब खानासह मुघलांच्या मोठ्या फौजेला जिथे कोंडीत पकडलं ती इतिहासातील प्रसिद्ध उंबेरखिंडीची लढाई याच चावणी गावच्या परिसरात लढली गेली होती. अशा अनेक गोष्टींचा उपयोग भविष्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. नागफणीच्या या सुळक्याच्या खालून जो बोगदा सुरू होईल तो तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा असेल. नवयुग कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला या प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांचं काम सोपविण्यात आलंय.

प्रवास वेगवान होणार, वेळ वाचणार

नऊ किमीचा हा बोगदा थेट लोणावळ्याला येऊन पोहोचणार आहे. म्हणजेच कळंबोली ते लोणावळा हे अंतर अक्षरशः हवेतून पार होणार आहे. या दोन पुलांमुळे आणि बोगद्यामुळे सहा ते सात किलोमीटरचं अंतर तर वाचणार आहेच, त्याचबरोबर वाहनांसाठी आत्ताची चढण निम्याने कमी होणार आहे. कारण बोगदा आणि पूल हे समान पातळीवर असणार आहेत.

या प्रकल्पातील दोन पूल बांधण्यासाठी 1491.50 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर दोन बोगद्यांसाठी 2697 कोटी रुपये खर्च आहे. एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल 235 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एक्स्प्रेस वेला नक्की किती टोल मोजावा लागेल याची कल्पना करुनच वाहनचालकांना घाम फुटू शकतो. हा सगळा प्रकल्प येणाऱ्या तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा दावा करण्यात आलाय.