उदयनराजेंचे छत्रपती घराण्याशी गादीचे की रक्ताचे नाते? : नवाब मलिक

| Updated on: Jan 16, 2020 | 6:35 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचे समर्थन केले आहे.

उदयनराजेंचे छत्रपती घराण्याशी गादीचे की रक्ताचे नाते? : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (15 जानेवारी) एका मुलाखतीत माजी खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांकडून त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचे समर्थन केले आहे.

“उदयनराजे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. छत्रपती घराण्याशी गादीचं नातं आहे की रक्ताचं नातं आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे यांच्याकडून अपेक्षित आहे. उदयनराजे यांनी उत्तर द्यायला हवे”, असे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, उदयनराजे यांच्या ‘तंगड्या तोडू’ या विधानाबाबत नवाब मलिक यांना प्रश्न विचारला असता, “कुणाची तंगडी कुणी तोडू शकत नाही. धमकी देऊन कधीही कुठलेही प्रश्न मिटत नाहीत. प्रश्नाला उत्तर धमकी नसते. प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यायचे असतील तर द्यावे, नाही द्यायचे असतील तर नको द्यावे”, असे नवाब मलिक म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने ‘शिवसेना’ हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ‘ठाकरे सेना’ करा, असा खोचक सल्लाही शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत यांनी उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता.

“उदयनराजे शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही”, असं संजय राऊत म्हणाले होते.