सायन किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात, योजना काय? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 18, 2022 | 9:27 PM

मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सायन किल्ल्याच्या (Sion Fort) संवर्धन आणि सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून यासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील समन्वयासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

सायन किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात, योजना काय? वाचा सविस्तर
राहुल शेवाळेंकडून किल्ल्याची पाहणी
Follow us on

मुंबई : मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सायन किल्ल्याच्या (Sion Fort) संवर्धन आणि सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून यासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील समन्वयासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. यासंदर्भात खासदार शेवाळे (Rahul Shevale) यांनी नुकताच सायन किल्ल्याचा पाहणी दौरा केला. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सायन किल्ला गेल्या काही काळापासून संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या किल्ल्याच्या खालच्या बाजूस असलेले उद्यान पुरातत्व विभागाकडून मुंबई महानगरपालिकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले असून या उद्यानाची देखभाल पालिकेकडून (Bmc) केली जाते. हा भाडेकरार पुढच्या वर्षी संपुष्टात येणार असून तो वाढविण्यासाठी पालिकेने पुरातत्व विभागाकडे विनंती केली आहे. तसेच या उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात येणारा आराखडा लवकरच पूर्ण होणार असून पुरातत्व विभागाच्या परवानगी नंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे.

मुंबई महापालिका काय करणार?

मुंबई महानगरपालिकेकडून उद्यानाची डागडुजी, संरक्षक भिंत, इतिहासाची माहिती देणारे फलक, दिवाबत्ती, वाचनालय, सुरक्षा व्यवस्था, वरिष्ठ नागरिकांसाठी बेंचेस, प्रसाधन गृह यांसह अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून देखील किल्ल्याच्या इतर भागाचे संवर्धन आणि जतन यासाठी आराखडा तयार केला जात असून यात किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी, ऐतिहासिक माहिती देणारे फलक, ऐतिहासिक वास्तूंचे अद्ययावत संवर्धन अशा बाबींचा समावेश असेल.

राहुल शेवाळे काय म्हणाले?

सायन किल्ल्याच्या संवर्धनासाठी  मुंबई महानगर पालिका आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या वतीने स्वतंत्ररित्या आराखडे तयार केले जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. याविषयी, पालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक येत्या आठवड्यात मी आयोजित केली आहे. या बैठकीत स्थानिक पोलीस आणि किल्ल्यावर मॉर्निग वॉक साठी येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांच्या फोरम मधील प्रतिनिधींच्या सुचनांचाही आढावा घेतला जाईल. दोन्ही प्राधिकरणाच्या समन्वयातून सायन किल्ल्याला लवकरात लवकर त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे राहुल शेवाळे म्हणाले आहेत.

Maharashtra corona, omicron update : मुंबईसह राज्याला काहीसा दिलासा, बऱ्याच दिवसांनी रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली

नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा, भाजप शिष्टमंडळांचं राज्यपाल कोश्यारींना निवेदन; कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा

चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात जायचं तिकडे जावं, आम्हीही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार-पटोले