‘…नाहीतर, महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही’, राज ठाकरे यांची राज्यपालांवर सडकून टीका

| Updated on: Nov 27, 2022 | 8:06 PM

राज ठाकरे यांनी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल करत त्यांच्यावर निशाणा साधला.

...नाहीतर, महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही, राज ठाकरे यांची राज्यपालांवर सडकून टीका
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रातली उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. त्यावर आमचं धोतर बोललं नाही का? कोश्यारी…(राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल). वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते नेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली.

“राज्यपाल महिन्याभरापूर्वी काय म्हणाले? म्हणे, इथले गुजराती आणि मारवाडी परत गेले तर काय होईल? कोश्यारी जी पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना, व्यापारी आहात ना? मग आपल्या क्षेत्रात का उद्योगधंदे नाही थाटलेत?”, असे सवाल राज ठाकरेंनी केले.

“याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी महाराष्ट्रासाठी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा. महाराष्ट्र मोठाच होता आणि आहे. देश नव्हता तेव्हा या भागाला हिंद प्रांत म्हणत”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचीही नक्कल

“काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्रीपदावर असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून (उद्धव ठाकरेंची नक्कल), एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी,आता फिरताहेत सगळीकडे”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“त्यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नव्हे. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मागे कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“ही लोकं करणार काहीच नाही, मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? त्याचं कारण कधीच भूमिका घेतली नाही. भूमिका घ्यायचीच नाहीय. फक्त पैशांसाठी, स्वार्थासाठी कधी हा तर कधी तो. पण बस मला सत्तेत बसवा”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.