कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा: मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

| Updated on: Mar 25, 2022 | 9:47 PM

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा: मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
Anil Parab ST corporation
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत असं सागंतानाच 31 मार्चपर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे (S.T. Corporation) अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी आज दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी (Employees) कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीत शासनाची भूमीका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.


महागाई भत्ता वाढला

यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यावरून 28 टक्के करण्यात आला, घरभाडे भत्ता 7 टक्के, 14 टक्के 21 टक्क्यावरुन 8 टक्के 16 टक्के आणि 24 टक्के करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये 5000, रुपये 4000 व रुपये 2500 अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये 7000 ते 9000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जादा भार पडला आहे.

पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास

ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने जबाबदारी घेतली असल्याची माहितीही मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहाला दिली.संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना 2500 ते 5000 रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात आली. यामुळे महामंडळावर सुमारे 24 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामगार आवाहनाला बळी

कृती समिती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असतानाही कर्मचारी संपावर ठाम राहिले. हे कामगार वेगवेळया आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती यासारख्या कारवाया आम्ही मागे घेतल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे 31 मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे पुन्हा एकदा आवाहन मंत्री, ॲड. अनिल परब यांनी केले.

विद्यार्थ्यांना नाहक त्रास

संपामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत अशा विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. एसटी संपाबाबत मंत्री ॲड. परब यांनी केलेल्या निवेदनावर विधान परिषद सदस्य जयंत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे आवाहन केले.

महत्वाचे निर्णय

  • समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांचा वेतनाची हमी घेतली आहे व त्यापोटी शासनाला वार्षिक सुमारे 4320 कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे.
  • कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये अनेकांचे प्राण गेलेले आहेत. महामंडळातील 308 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शासन निकषामध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 50 लाखाची मदत महामंडळाने केली असून इतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 5 लाखाची मदत महामंडळाने केली आहे.
  • मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा रुपये 10 लाखाची आर्थिक मदत देण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे.

संबंधित बातम्या

Yogi Cabinet : भाजपनं यूपीच्या मंत्रिमंडळात जातीय गणितं जुळवली, योगींच्या ठाकूर समाजाला किती मंत्रिपदं?

Delhi High Court : ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागू; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

आजऱ्याचा ‘चाळोबा गणेश’ अडकुरच्या घटप्रभेत; भरदिवसा केंचेवाडीत घुसला