Tv9 Marathi Special Report : राज ठाकरे आणि भूमिकांचं चक्रव्यूह

| Updated on: Apr 10, 2024 | 9:27 PM

राज ठाकरेंचं भाषण आणि भूमिकांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. सोशल मीडियात दोन्ही बाजूनं घमासान रंगलंय. महायुतीच्या नेत्यांकडून मनसेच्या भूमिकेचं स्वागत होतंय तर मविआकडून टीका. २०१९ ला जे महायुतीचे नेते बोलत होते, तेच आता मविआचे नेते बोलत आहेत. मनसेचे टीकाकार बदलले आहेत, मात्र टीका कायम आहे.

Tv9 Marathi Special Report : राज ठाकरे आणि भूमिकांचं चक्रव्यूह
Raj thackeray
Follow us on

राज ठाकरेंच्या भाषणातले मुद्दे हे त्यांच्याच भूमिकांच्या चक्रव्युहात अडकले आहेत. कालच्या भाषणावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत होतंय. काही मनसैनिकांनी राजीनामा दिलाय. तर काहींनी योग्य भूमिका म्हणून कौतूक केलंय. राज ठाकरे म्हणाले की, राजकीय व्यभिचार करणाऱ्यांना राजमान्यता देवू नका. त्याच भाषणात राज ठाकरेंनी युतीला पाठिंबा दिल्यानं विरोधक प्रश्न करत आहेत. मी पक्ष फोडून राजकारण करत नाही, म्हणून त्यांनी शिंदे-अजितदादांना अप्रत्यक्ष टोला मारला. पण पक्ष फोडणाऱ्यांना पाठिंबा कसा., असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

परिस्थिती न सुधारल्यास बेरोजगार तरुणाई आणि उद्योगांवरुन देशात अराजकता माजण्याची शक्यताही वर्तवली. त्यावर या परिस्थितीला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत. लोकसभेच्याच जागावाटपात मारामाऱ्या सुरु आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांना विधानसभेसाठी सज्जतेचे आदेश दिले. पण त्याची तयारी स्वतंत्रपणे करायची, की युतीत, यावर त्यांनी भाष्य केलं नाही.

दिल्लीला जाताना फक्त या, इतकाच निरोप मिळाल्याचं राज ठाकरे म्हटले होते. काल आपण स्वतः शाहांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 च्या लोकसभेत राज ठाकरेंनी युतीत फक्त शिवसेनेविरोधात लोकसभा उमेदवार दिले. पण भाजपला पाठिंबा दिला. 2019 ला भाजपविरोधात देशातल्या सर्व पक्षांनी एकत्र या म्हणत मोदींविरोधात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. आता 2024 ला भाजपसह त्यांच्या सोबतच्या शिवसेना-राष्ट्रवादीला पाठिंबा देतोय, पण तो पाठिंबा मोदींना असल्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे.

जशी राज ठाकरेंची भूमिका बदललीय, तशी सत्ताधारी-विरोधकांची सुद्धा. 2019 ला भाजप-शिवसेनेचे नेते जे राज ठाकरेंबद्दल बोलत होते., तेच आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंबद्दल बोलत आहेत.

मनसेचा ध्वज बदलल्यानंतरही राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिका चर्चेत होत्या. भाषणाची सुरुवात जमलेल्या ”मराठी-बंधूभगिणीं” ऐवजी. जमलेल्या ”तमाम हिंदू बांधवां”पासून सुरु झाली. स्वतंत्र विदर्भाबद्दल राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेनं आश्चर्य व्यक्त झालं. परराज्यात जाणाऱ्या उद्योगांवरुन राज ठाकरेंनी केलेलं विधानही चर्चेत राहिलं.

भाजप खासदार बृजभूषणसिंहांच्या विरोधामागे भाजप होती की मग विरोधक, यावर राज ठाकरेंनी मोघम विधान केलं. महिन्याभरापूर्वी कडेवरची पोरं म्हणून भाजपवर, त्याच्याआधी राष्ट्रवादीवर आणि त्याआधी धनुष्यावरुन राज ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली होती. पण ही टीका प्रासंगिक आहे., की मग पक्षाची भूमिका? यावरुन संभ्रम अजून वाढत गेला.

काल राज ठाकरेंनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र दीड महिन्यापूर्वी शर्मिला ठाकरेंनी पुण्यात साईनाथ बाबरांबद्दल लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले. त्यावर नाराज झालेले वसंत मोरेंनी पक्ष सोडला. आणि प्रत्यक्षात मनसेनं लोकसभेतून माघार घेतली.

राज ठाकरेंच्या या भूमिकेवर सोशल मीडियात खल रंगतोय. बहुतांश प्रतिक्रिया भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करणाऱ्या आहेत. काहींनी 2019 ते 2024 दरम्यान इंजिनाची दिशा कशी बदलली म्हणून हा व्हिडीओ शेअर केलाय. तर काहींनी राजकीय व्यभिचाराला मान्यता देवू नका., असं सांगत मनसेनं विनाअट पाठिंबा कुणाला कुणासाठी दिला? यावरुन झालेल्या संभ्रमावर या मुलाचा व्हिडीओ पोस्ट केलाय.

भूमिकांवर मौन बाळगून मनसे सत्तेत गेली नाही, हे वास्तव आहे. इतर अनेक पक्ष परतीची वाट शाश्वत राहावी., म्हणून टीकेवेळी हात
आखडता घेतात. नंतर विकासासाठी आम्ही सत्तेत जातोय, ही सबब जीवंत ठेवली जाते. राज ठाकरेंची स्टाईल मात्र एक घाव, दोन तुकड्यांची राहिलीय. तेच जुने शाब्दिक घाव आणि भूमिकांचे तुकडे मनसेच्या वाटेत अडथळे बनत आले. इतर पक्षात सर्वपक्षीय संबंध जपणारी नेत्यांची एक फळी असते.

जी फळी भूमिका बदलावेळी डॅमेज कंट्रोल करते. म्हणजे प्रचारात ज्या पक्षाच्या वक्त्यांनी वार करायचे., निकालानंतरच्या त्याच पक्षातल्या नेत्यांनी वाटाघाटी तळीस न्यायच्या. मनसेत मात्र राज ठाकरेच सर्वेसर्वा आहेत. प्रमुख नेतेही तेच आणि प्रमुख वक्तेही तेच. म्हणूनच नेता असणाऱ्या राज ठाकरेंवर त्यांच्यातलाच वक्ता कायम प्रश्न उभे करत आलाय.