Nanded | शिंदेंच्या बंडानं नांदेडात बाबुराव कदमांना बळ, शेकडो शिवसैनिक शिवबंधन सोडण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देणार

| Updated on: Aug 01, 2022 | 5:50 PM

मागील निवडणुकीत बंडखोर कदम यांना कपबशी असे नवखं निवडणूक चिन्ह मिळालं होतं तरीही त्यांना मिळालेली मते सर्वानाच आश्चर्य चकित करणारी होती.

Nanded | शिंदेंच्या बंडानं नांदेडात बाबुराव कदमांना बळ, शेकडो शिवसैनिक शिवबंधन सोडण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देणार
नांदेड बाबुराव कदम
Follow us on

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय नांदेडच्या हदगाव- हिमायतनगर (Nanded Hadgaon) तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर केलाय, शिवसेना नेते बाबुराव कदम (Baburao Kadam) यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा आग्रह कदम यांना केलाय. गत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने बाबुराव कदम यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, त्यात अल्पशा मताने कदम यांचा पराभव झाला होता. त्या नंतर राज्यात घडलेल्या राजकीय बदलानंतर बाबुराव कदम यांनी आज समर्थकांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात सर्वानीच शिंदे गटासोबत जाण्याची मागणी केलीय. या मेळाव्या नंतर tv9 मराठीशी बोलताना कदम यांनी आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगांवला आमंत्रित करून मोठी सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केलंय.

कोण आहेत बाबूराव कदम?

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील 25 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले बाबूराव कदम हे प्रचंड लोकप्रिय नेते म्हणून दोन्ही तालुक्यात परिचित आहेत. गत विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र ऐनवेळी विद्यमान आमदाराला डावलता येत नाही म्हणत सेनेने आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर बंडखोरी करत बाबुराव कदम यांनी या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराने कदम यांचा पराभव केला. या पराभवानंतरही कदम यांचा जनाधार कायम राहिला त्यामुळे त्यांनी खचून न जाता समाजकार्य पुन्हा सुरू ठेवले.

शिवसेनेकडून दखल नाही, शिंदे गटाचा आग्रह

गेल्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव कदम यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारापेक्षाही 20 हजार मते जास्त घेतली, बंडखोरी केलेल्या कदम यांना 61 हजार मते होती तर सेनेच्या उमेदवाराला 41 हजार मते होती. स्थानिकांनी कदम यांना पसंती दिल्यानंतर पक्षाने मात्र त्यांच्याशी संवाद साधला नाही. म्हणूनच गेली अडीच वर्षे शांत राहिलेले कदम समर्थक आता एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याचा आग्रह धरत आहेत.

आला बाबुराव गाणं लोकप्रिय…

गेल्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव कदम यांना समर्थकानी पैसे गोळा जमा करून निवडणुकीत उभे केले होते. या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांनी आला बाबुराव आला बाबूराव या गाण्याचा मोठा वापर केला होता. या निवडणुकीत बंडखोर कदम यांना कपबशी असे नवखं निवडणूक चिन्ह मिळालं होतं तरीही त्यांना मिळालेली मते सर्वानाच आश्चर्य चकित करणारी होती.

घराणेशाही आणि बाबुराव

हदगाव विधानसभा मतदारसंघात निवृत्ती पाटील जवळगावकर आणि त्यांचे पुत्र माधवराव पाटील, बापुराव पाटील आष्टीकर आणि त्यांचे पुत्र नागेश पाटील तसेच अंजनाबाई पाटील त्यांच्या कन्या सुर्यकांता पाटील तसेच सुर्यकांता पाटील यांचे आजोबा माधवराव पाटील वायपनकर असे घराणेशाहीतील आमदार या मतदारसंघाने पाहिलेत. अपवाद केवळ सुभाष वानखेडे या सेनेच्या आमदारांचा होता. त्यामुळे बाबुराव कदम यांना सर्वसामान्यांचा नेता म्हणून पसंती मिळताना दिसतेय.