फक्त मनावर घ्या अन् कामाला लागा, नांदेडच्या विद्यापीठानंही करून दाखवलं, रखरखीत परिसर हिरवाईने नटला!

| Updated on: Mar 15, 2023 | 10:34 AM

फेब्रुवारी संपू लागला की मराठवाड्यातील दुष्काळी भागात टँकरच्या वाऱ्या सुरु होतात. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही ४ वर्षांपूर्वी हेच चित्र होतं. पण आता विद्यापीठ परिसर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय.

फक्त मनावर घ्या अन् कामाला लागा, नांदेडच्या विद्यापीठानंही करून दाखवलं, रखरखीत परिसर हिरवाईने नटला!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राजीव गिरी, नांदेड | रखरखीत ऊन, सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी या गोष्टी मराठवाड्यासाठी (Marathwada) नवीन नाहीत. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च (March) महिना सुरु झाला की बोअरवेल कोरडे पडतात. विहिरींची पातळी खोल जाते. अशा वेळी टँकरशिवाय पर्याय उरत नाही. मराठवाड्यातील असंख्य गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. गावातच काय शहरांमधूनही अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्याशिवाय उन्हाळ्यात काहीच पर्याय नसतो. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठदेखील वर्षानुवर्षांपासून या टँकरच्या दुष्टचक्रात अडकलं होतं. पण चार वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनानं मनावर घेतलं. हे दुष्टचक्र भेदून काढण्याचा निर्णय घेतला. कुलुगुरूंनी मार्गदर्शन केलं अन् प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साथ दिली. उपक्रम सुरु केला त्याच वर्षी जलदेवतेनं साक्षात्कार दिला अन् आज चार वर्षानंतर विद्यापीठ परिसर जलसमृद्धीने बहरून आलाय.

काय प्रयोग केला?

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संपूर्ण टीमने विद्यापीठ परिसरातून टँकरला हद्दपार केलंय. 2019 पूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.विद्यापीठ परिसराच्या बाहेरून विकत पाणी घ्यावं लागत होतं. 2019 नंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी “क्लीन सिटी ग्रीन सिटी” ही संकल्पना मांडली. कुलुगुरुंची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरुवातीला पाण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्यात आली. ५५० एकर परिसरात विद्यापीठाच्या विविध विभागाच्या इमारती उभ्या आहेत.

दरम्यान विद्यापीठाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सुरुवात झाली. परिसरात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अडवण्यात आला.आणि जमिनीत जिरवण्यात आला.त्यामुळे विद्यापीठ परिसरातील हात पंप,विहीर, आणि शेत तळ्यात पाण्याची पातळी वाढलीय.पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तब्बल 12 कोटी पाणी साठवणीचा नवा विक्रम केला आहे.पाणी टंचाईवर मात करत विद्यापीठ परिसर निसर्ग सौंदर्याने नाटल्याचे दिसत आहे.

वर्षभरातच जलदेवतेचा साक्षात्कार

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागातील डॉ. अविनाश कदम म्हणतात, आम्ही साधारण जानेवारी २०१९ ला काम सुरु केलं. त्याच वर्षी जून महिन्यात पाण्याचा चांगलाच साठा झाला. २०२० च्या कोव्हिड काळातही खूप काम केलं. आज ४ हजार कोटीवरून पाण्याचा साठा तब्बल १२ हजार कोटी लीटरपर्यंत पोहोचला आहे. २०१८ पर्यंत अनेक टँकरने पाणी वर्षभर घ्यावं लागत होतं. प्रशासकीय इमारती, गार्डन, होस्टेलसाठी विकत घेत होतो. आज कँपसवर मुबलक पाणी आहे. नियमित सहा विहिरी भरलेल्या आहेत. ते पाणी पुरेसं आहे. विद्यापीठ परिसरात १४ बोअर्स आहेत. त्यापैकी १० बोअरवेलवर आम्ही जलपुनर्भरण यंत्रणा राबवली आहे. तिचे परिणाम आता दिसू लागलेत.