Nashik water scarcity : ठाणे-नाशिक हद्दीवरच्या बिबलवाडीत भीषण टंचाई; हंडाभर पाण्यासाठी 5 किलोमीटरची पायपीट

यंदा भरपूर पाऊस झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यात गोदावरीला पाच वेळेस पूर आला. मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारी इगतपुरी तालुक्यातली सर्व धरणे भरली. मात्र, तरीही ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या हद्दीवर असलेल्या शहापूर तालुक्यातल्या बिबलवाडीत नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा (water scarcity) सामना करावा लागतोय. येथील आदिवासी महिलांना महामार्गालगत असलेल्या टोपाच्या बावडीवरून हंडाभर पाण्यासाठी दोन ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

Nashik water scarcity : ठाणे-नाशिक हद्दीवरच्या बिबलवाडीत भीषण टंचाई; हंडाभर पाण्यासाठी 5 किलोमीटरची पायपीट
इगतपुरी तालुक्यातील कथरूवांगण, बिबलवाडीच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी रोज पाच-पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 9:33 AM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः यंदा भरपूर पाऊस झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यात गोदावरीला पाच वेळेस पूर आला. मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारी इगतपुरी तालुक्यातली सर्व धरणे भरली. मात्र, तरीही ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या हद्दीवर असलेल्या शहापूर तालुक्यातल्या बिबलवाडीत नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा (water scarcity) सामना करावा लागतोय. येथील आदिवासी महिलांना महामार्गालगत असलेल्या टोपाच्या बावडीवरून हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तर पाण्याचा टँकर न आल्यास पाच किलोमीटर दूर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घटनादेवी येथून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे बिबलवाडी गाव हे उंच टेकडीवर वसलेले आहे. त्यामुळे याठिकाणी टँकर देखील जात नाही. तसेच या गावाखालून रेल्वे मार्गातील बोगदे असल्याने बोरवेल खोदण्याची परवानगी देखील शासन देत नाही. त्यामुळे येथील आदिवासींसमोर जगायचे कसे, असा प्रश्न आहे. कथरूवांगण पाड्यावरही अशीच परिस्थिती असून येथील गावकऱ्यांनाही दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागते.

भावली योजना झाल्यास…

बिबलवाडीतील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. उन्हाळ्यातच काय निवडणुका आल्याशिवाय या ठिकाणी पुढारी लोक फिरकत नाहीत. तेव्हाही फक्त आश्वासने दिली जातात. पाण्याचा प्रश्न कोणीच सोडवत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली येथील टंचाई आजही सुरू आहे. ती अजून किती दिवस सुरू राहील, याची माहिती नाहीत. या गावाची या संकटातून सुटका करण्याचा मार्ग एकच. तो म्हणजे भावली पाणीपुरवठा योजना. मात्र, गावकऱ्यांचे हे म्हणणे लक्षात घेतो कोण, असा प्रश्न आहे.

सिन्नरमध्ये हंडा मोर्चा

सिन्नर शहरामध्ये अनेक भागांमध्ये चार ते पाच दिवस पाणी येत नाही. पाणी आले तरी ते पंधरा ते वीस मिनिटच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ सिन्नर शहरवासीयांवर आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी सिन्नर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला.