एक बिबट्या जेरबंद, एक मोकाट, पंचक्रोशीत भीती

| Updated on: Sep 03, 2021 | 12:08 PM

इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे एका बिबट्याला (leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला (Nashik Forest) यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. मात्र, दुसरीकडं नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून दुसऱ्याच बिबट्यानं त्याचा फडशा पाडल्याचं समोर आलंय.

एक बिबट्या जेरबंद, एक मोकाट, पंचक्रोशीत भीती
Leopard
Follow us on

नाशिकः इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे एका बिबट्याला (leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला (Nashik Forest) यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. मात्र, दुसरीकडं नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून दुसऱ्याच बिबट्यानं त्याचा फडशा पाडल्याचं समोर आलंय. त्यामुळं पंचक्रोशीतल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरणय. (One leopard in a forest trap)

गेल्या अनेक दिवसांपासून बेलगाव कुऱ्हे आणि नांदूरवैद्य पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरूय. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीही भीती वाटतेय. बेलगाव कुऱ्हे येथील एका पोल्ट्री शेडजवळ मंगळवारी सायंकाळी वनविभागानं पिंजरा लावला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सावज म्हणून एक शेळी बांधली होती. शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या पहाटे चारच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यानं लोखंडी जाळ्यांना धडका दिल्या. त्यामुळं तो रक्तबंबाळ झाला. चवताळलेल्या बिबट्यानं डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला. त्याला पाहण्यासाठी सकाळपासूनच परिसरातल्या नागरिकांची तोबा गर्दी जमली. अखेर भुलीचं इंजेक्शन देऊन या आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. पिंजरा रेस्क्यू व्हॅनला लावून वनविभागाचे अधिकारी त्याला घेऊन गेले. त्याला आता सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणारंय.

दुसऱ्या बिबट्याचा श्वानावर हल्ला

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून बिबट्यानं त्याचा फडशा पाडला. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी होतेय. नांदूरवैद्यच्या पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्याला पाहिले आहे. भक्ष्य शोधण्यासाठी दुपारी देखील बिबट्याचा परिसरात वावर आहे. नांदूरवैद्य ते वंजारवाडी भागात उसाची शेती जास्त आहे. ती बिबट्याच्या आश्रयासाठी सुरक्षित ठिकाण आहे. या भागात कुक्कुट पालनही केलं जातं. येथे चार पोल्ट्री फार्म आहेत. त्यामुळं शिकारीच्या शोधात या परिसरात बिबट्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत. एक बिबट्या जेरबंद करताच आता दुसऱ्यानं दर्शन दिल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे.

शेतकरी धास्तावले

नांदूरवैद्य येथील शिवाचा ओहोळ, सायखेडे मळा, कर्पे मळा भागात नागरिकांनी बिबट्याला पाहिलंय. एक बिबट्या जेरबंद करताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी बिबट्यानं हल्ला करून श्वानाचा फडशा पाडल्यानं तालुक्यात दुसरा बिबट्या असल्याचं समोर आलंय. काही महिन्यांपूर्वीही बिबट्यानं या परिसरात हजेरी लावली होती. सायखेडे मळा परिसरात एका गायीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती. आता बुधवारी रात्री दोनच्या सुमारास कर्पे मळ्यामध्ये बिबट्यानं एका श्वानावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी केली आहे.

गेल्यावर्षीही वावर

बेलगाव कुऱ्हे पंचक्रोशीत गेल्या वर्षीही बिबट्याचा वावर होता. त्यानं अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागानं एका पोल्ट्री शेडजवळ पिंजरा लावला. त्यावेळेही या जाळ्यात बिबट्या अलगद अडकला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. (One leopard in a forest trap)

संबंधित बातम्याः
नाशिकमध्ये मनपा आणि मूर्तीकारांचा पुढाकार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘माझा बाप्पा’ उपक्रम

भाकरीच्या चंद्राला महागाईचं ग्रहण; 8 महिन्यांत गॅस सिलिंडर दर 190 रुपयांनी वाढले

अहो आश्चर्यम्, नाशकातून शेकडो नाले चोरीला!