Nashik | राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम, नवमतदारांना मिळणार ओळखपत्र!

| Updated on: Jan 25, 2022 | 7:01 AM

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन देणे व सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा आहे.

Nashik | राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम, नवमतदारांना मिळणार ओळखपत्र!
National Polling Day
Follow us on

नाशिकः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ (National Polling Day) साजरा होत आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी 12 वाजता कार्यक्रम होणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली.

ही आहे संकल्पना

12 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘Making Elections Inclusive, Accessible and Participative’ म्हणजेच “सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” अशी जनजागृतीची संकल्पना आयोगाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन देणे व सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून, त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते.

यांचा होणार गौरव

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत विविध महाविद्यायांमध्ये चित्रकला, रांगोळी, निबंध अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना तसेच विधानसभा मतदारसंघात उत्कृष्ट कार्य करणारे, उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), निवडणूक नायब तहसीलदार, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मतदार नोंदणीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समाजात रुजावे यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करावा. तसेच कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड-19 बाबतच्या शासनाच्या नियमांचे पालन करून सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे होणार कार्यक्रम

जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त सर्व निवडणूक साक्षरता मंडळास राष्ट्रीय मतदार दिन रोजी शपथ घेवून साजरा करावा, अशी सचूना देण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम प्रांत, तहसीलस्तरावर तसेच महनगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनी साजरा करावा. जिल्ह्यातील थिंक टँक सदस्यामधील मान्यवरांना तसेच जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे, असे आवाहन केले आहे. सर्व ग्रामपंचायती, विद्यापीठ अथवा महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा होणार असून, या प्रसंगी शपथ घेण्याच्या कार्यक्रमासोबत निवडणूक व लोकशाही विषयावर रांगोळी, खेळ, वकृत्व तसेच व्याख्यान अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी